अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी किरण बेदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यास विरोध केला होता, असे सांगत आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी शुक्रवारी बेदी यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. भाजपमधील भ्रष्टाचारी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यास आपण किरण बेदी यांचाही प्रचार करण्यास तयार आहोत, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आप या दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करीत आहेत. त्यातच एकेकाळी अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास यांच्यासोबत आंदोलन करणाऱया किरण बेदी यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे या नेत्यांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका होती आहे. किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे आपचे नेते त्यांना लक्ष्य करीत आहेत.
किरण बेदी काही वर्षांपूर्वी सीबीआयला केंद्र सरकारच्या पंज्यातून मुक्त करण्याची मागणी करीत होत्या. मात्र, आता त्यांच्याच पक्षाचे सरकार सीबीआयचा गैरवापर करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला. तसेच याबद्दल बेदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही कुमार विश्वास म्हणाले.