Monalisa Bhosle Minor Farman Khan POCSO Case Update: महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेत आली होती. मागच्याच महिन्यात तिने केरळमध्ये जाऊन मुस्लिम युवक फरमान खानशी लग्नगाठ बांधली. यानंतर तिची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली. या लग्नावर मोनालिसाच्या पालकांनी आक्षेप घेतला होता. हे आंतरधर्मीय लग्न आम्हाला अंधारात ठेवून केले गेले असल्याचे पालकांनी म्हटले होते. आता या प्रकरणात मोठी घडामोड घडली असून पोलिसांनी मोनालिसा अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे.
मोनालिसा अल्पवयीन ठरल्याचे सांगत मध्य प्रदेशच्या खारगाव पोलिसांनी तिचा पती फरमान खानविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता कायद्याच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत गुन्हेगारी कट आणि अवैध विवाहाशी संबंधित कलमांखालीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनालिसा अल्पवयीन कशी ठरली?
रुग्णालयातील अधिकृत नोंदीच्या आधारे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने निश्चित केले की, मोनालिसाचा जन्म ३० डिसेंबर २००९ रोजी झाला. त्यामुळे ११ मार्च रोजी लग्नाच्या वेळी तिचे वय १६ वर्ष, २ महिने आणि १२ दिवस इतके होते.

मोनालिसा पहिल्यांदा महाकुंभ मेळाव्यादरम्यान चर्चेत आली होती. रुद्राक्ष माळा विकतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिचे कौतुक केले होते. एका रात्रीत सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर पुढे ती वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत येऊ लागली.
लग्नाचा वाद कसा उद्भवला?
मोनालिसा आणि फरमान खान यांचा विवाह ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरमजवळील अरुमानूर श्री नैनार देवा या मंदिरात पार पडला. मंदिर प्रशासनाने सांगितले की, फरमान आणि मोनालिसा यांच्या आधार कार्डवरील वय पाहून दोघांचे लग्न लावण्यात आले. तसेच बनावट जन्म प्रमाणपत्र वापरून ग्रामपंचायतीमध्ये लग्नाची नोंद झाली असल्याचेही तपास अधिकाऱ्यांना आढळले.
महेश्वर नगरपालिकेने दिलेल्या जन्म प्रमाणपत्रात मोनालिसाचा जन्म १ जानेवारी २००८ रोजी झाल्याचे नमूद केले आहे. ही तारीख सरकारी रुग्णालयात नोंद झाल्याच्या दोन वर्ष आधीची आहे. त्यामुळे आयोगाने बनावट जन्म प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले.

तसेच या लग्नात काही राजकीय नेते आणि संघटनाच्या कथित सहभागावरही बोट ठेवले. १७ मार्च रोजी आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली असता वकील प्रथम दुबे यांनी दावा केला की, केरळमधील सीपीआय (एम) पक्षाचे नेते आणि पीएफआय पक्षाच्या सदस्यांनी हे लग्न घडवून आणण्यात सहभाग घेतला.
वकिलांनी असेही म्हटले की, लव्ह जिहादच्या संकल्पनेला प्रत्युत्तर देण्यासाठी या लग्नाचा घाट घातला गेला. यानंतर आयोगाने केरळ आणि मध्य प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावत २२ एप्रिल रोजी दिल्ली येथे आयोगाच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
फरमान खान हा स्वतः एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते.
