Monalisa Bhosle marries Farman Khan in Kerala temple: प्रयागराज कुंभमेळ्यात प्रसिद्धी मिळवलेल्या मोनालिसा भोसले (१८) हिने केरळमधील फरमान खानशी विवाह केल्यानंतर हे प्रकरण देशभरात चर्चेत आले आहे. मध्य प्रदेशातील महेश्वर शहरातील आणि भटक्या पारधी समुदायातील मोनालिसा सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विवाहानंतर तिच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

“मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले”

केरळमधील पूवर येथील अरुमानूर परिसरातील नैनार मंदिरात काही राज्य मंत्र्यांच्या उपस्थितीत विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. विवाहानंतर मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की त्यांच्या मुलीला फसवून अडकवण्यात आले असून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम तरुणाने त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाह केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांना विनंती केली की मोनालिसाला सुरक्षितपणे मध्य प्रदेशात परत आणावे.

अशी कल्पानाही केली नव्हती!

जयसिंग भोसले यांनी असेही सांगितले की मोनालिसा चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा व्यक्त करत होती. तिला अभिनय आणि नृत्य प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. काही लोक तिला प्रशिक्षण देतील आणि भविष्यात चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र अशा प्रकारे विवाह होईल याची कल्पना नव्हती, असे त्यांनी नमूद केले.

विवाहानंतर जोडपे काय म्हणाले?

दरम्यान, हिंदू जागरण मंचच्या काही कार्यकर्त्यांनी मोनालिसाला भेटून तिला घरी परतण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खान यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तिरुवनंतपुरम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की त्यांचा विवाह पूर्णपणे परस्पर संमतीने झाला आहे. धर्मांतर किंवा कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. विवाहानंतर दोघांनीही आपला धर्म बदललेला नाही, तसेच त्यांच्या नात्यात धर्म हा कधीही अट नव्हता, असे त्यांनी सांगितले.

मोनालिसाने म्हटले की हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक पातळीवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.