कॉमेडियन कुणाल कामराने मराठी कॉमेडीयन प्रणित मोरेवर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. कुणाल कामरा हा देखील एक कॉमेडियन आहे त्याने एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या उपहासात्मक गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्याचा कॉमेडी शो ज्या ठिकाणी झाला ते हॉटेलही फोडण्यात आलं होतं. आता याच कुणाल कामराने प्रणित मोरेच्या ३७० रुपयांची बिर्याणीच्या वादात उडी घेतली आहे. क्राऊड वर्कच्या मागे कुठल्याही कॉमेडियनने लपता कामा नये या आशयाची एक पोस्ट कुणाल कामराने लिहिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मराठी कॉमेडियन प्रणित मोरे याच्या गुडगाव येथील शोमध्ये क्राऊड वर्कच्या दरम्यान हिमांशू जांग्रा या प्रेक्षकाने त्याचा अनुभव सांगताना ३७० रुपये एका महिलेला खाऊ घातल्यानंतर ते वसुल करण्यासाठी तिचा विनयभंग कसा केला ते रंगवून सांगितलं आणि त्यावर त्याच्यासह प्रणित मोरे आणि इतर सगळे प्रेक्षक जोरदार हसले. हिमांशूने १३ मिनिटं हा सगळा किस्सा सांगितला. तो प्रणितला इतका आवडला की त्याने हिमांशूला त्याच्याकडे असलेले जवळपास सगळेच पैसे देऊन टाकले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला. यानंतर सेजल पवार या तरुणीनेही एक अश्लील विधान केलं. शिवाय हे विधान देहदानानंतर रुग्णालयात आलेल्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबाबत करण्यात आलं तो व्हिडीओही व्हायरल झाला. या दोन्ही व्हिडीओजमुळे अडचणीत आलेल्या प्रणित मोरेला माफी मागावी लागली. आता कुणाल कामराने त्याच्यावर जोरदार टीका केली आहे आणि क्राऊड वर्कच्या मागे लपू नकोस असं म्हणत त्याला खडे बोल सुनावले आहेत.

Himanshu Jangra fired from Gurgaon firm over viral podcast remark | Pranit More biryani controversy video screenshot | हिमांशू जांग्रा नोकरीवरून बडतर्फ प्रणीत मोरे बिर्याणी वाद | प्रणीत मोरे पॉडकास्ट वादग्रस्त बिर्याणी वक्तव्य व्हिडिओ
प्रणीत मोरे बिर्याणी वादामुळे हिमांशू जांग्रा नोकरीवरून बडतर्फ

काय म्हटलंय कुणाल कामराने?

प्रणित मोरेने माफी मागितल्यावर प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने एक पोस्ट लिहिली आहे त्यात तो म्हणतो की कुठल्याही कॉमेडियनने क्राऊड वर्कच्या मागे लपून बसू नये. असं म्हणत कुणाल कामराने एक यादीच पोस्ट केली आहे, तो म्हणतो कॉमेडियनने गोष्टी ऐकवणं, क्राऊड वर्क, कठोर मेहनत, तुमची जमा पुंजी आणि तुमचे आई वडील या सगळ्याच्या मागे भ्याडपणे लपू नये. दुसऱ्या एका पोस्टमध्ये कुणाल कामरा म्हणतो मला प्रणित मोरे हा हर्ष गुजराल किंवा बराक ओबामा यांच्यासारखा वाटतो आहे. यातून कुणाल कामराने हा संदेश दिला आहे की जो काही वाद झाला तो ज्या पद्धतीने प्रणित मोरेने हाताळला ती पद्धत अतिशय बालिश आणि बेजबाबदार होती. त्यामुळे कुणाल कामराने एका अर्थाने प्रणित मोरेला शेलक्या शब्दांत शालजोडीतून टोले लगावले आहेत. कुणाल कामराने प्रणित मोरेला खडे बोल सुनावल्याची चर्चा ट्वीटरवर चांगलीच रंगली आहे.

कुणाल कामराच्या ट्वीटवर नेटकरी काय म्हणत आहेत?

  • एका नेटकऱ्याने म्हटलंय की तुम्ही जे वर्तन करता त्यात तुमचं सामाजिक भान दिसून येतं. प्रणित मोरेकडे ते मुळीच नाही. अशा पद्धतीने महिलेचा अपमान केला जातोय आणि तुम्ही खिदळत त्याची मजा घेत आहात. अत्यंत बेशरम प्रवृत्ती यातून दिसून येते आहे.
  • आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय की भारतातल्या कॉमेडियन्सनी क्राऊड वर्क हा प्रकार थांबवला पाहिजे कारण त्यात ते अश्लील किंवा शिवराळ बोलतात आणि इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमवर जाऊन बसतात. याबाबत कुणालाही काहीही वाटत नाही.
  • आणखी एक नेटकरी म्हणतो, स्टँड कॉमेडीचा भारतातला प्रकार ठरलाय. शिव्या द्यायच्या, शरीराच्या आकारावरुन अश्लाघ्य बोलायचं, महिलांचा अपमान करायचा बस्स यालाच हे लोक कॉमेडी म्हणतात. दुर्दैवी आहे.

प्रणित मोरेने माफी मागत काय वक्तव्य केलं?

प्रणित मोरेच्या शो वरुन जो वाद झाला त्यानंतर त्याने व्हिडीओ पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आणि माफी मागितली. तो तरुण जेव्हा तरुणीबाबत आक्षेपार्ह विधान करत होता तेव्हा मी त्याला थांबवलं नाही ही माझी मोठी चूक झाली हे मला मान्य आहे. जी टीका माझ्यावर होते आहे ते योग्यच आहे. मी ठरवलं असतं तर त्या व्यक्तीला थांबवू शकलो असतो. पण मी त्याला बोलू दिलं आणि प्रकरण वाढलं. माझ्या वर्तनामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. मी त्याबाबत माफी मागतो. असं म्हणत प्रणित मोरेने दिलगिरी व्यक्त केली.

कॉमेडीच्या सीमांवर पु्न्हा चर्चा

प्रणित मोरेच्या या प्रकरणामुळे कॉमेडीला सीमा असाव्यात की नसाव्यात? याबाबत पु्न्हा चर्चा सुरु झाली आहे. एका वर्गाचं हे मानणं आहे की जे काही घडलं आहे त्याला कॉमेडी म्हणता येणारच नाही. आता ३७० रुपयांच्या बिर्याणीचा जो काही प्रकार घडला आहे तो प्रकार म्हणजे कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलतेला दिलेलं प्रोत्साहन आहे असंही एका वर्गाला वाटतं आहे. तर काहींना कॉमेडीला सीमा रेषा असल्या पाहिजेत, त्यावर मर्यादा असल्या पाहिजेत असंही वाटतं आहे.