“…म्हणून मला २५ लाखांची भरपाई द्या”; कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस

कुणालने आता या प्रकरणात थेट न्यायलयात जाण्याची तयारी केली आहे

इंडिगोला कायदेशीर नोटीस

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने इंडिगो एअरलाइन्सला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कंपनीने बंदी घातल्याने झालेल्या मानसिक त्रासाच्या मोबदल्यात २५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुणालने केली आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानात डिवचल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट केल्यानंतर कुणालवर इंडिगो कंपनीने सहा महिन्यांसाठी विमान प्रवासाची बंदी घातली. याच कारवाई विरोधात आला कुणाल थेट न्यायलयात गेला आहे.

कुणालच्या काय मागण्या आहेत?

कुणालने पाठवलेल्या नोटीसमध्ये, ‘कंपनीने आपल्यावरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी’ अशी मागणी केली आहे. तसेच ‘कंपनीने सर्व वर्तमानपत्रे, इलेक्ट्रीक माध्यामे आणि कंपनीच्या सर्व सोशल नेटवर्किंग साईट्स अकाऊंटवरुन आपली बिनशर्थ माफी मागावी,’ अशी मागणीही कुणालने केली आहे. ‘कंपनीने केलेल्या कारवाईमुळे मला मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे माझ्यावर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी,’ असं कुणालने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने एक ट्विटही केलं आहे.


काय आहे प्रकरण?

कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी २८ जानेवारी रोजी मुंबईहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E 5317 या विमानाने प्रवास करत होते. प्रवासदरम्यान कुणालने गोस्वामी यांच्या आसनाजवळ जात आपल्या शैलीत विविध प्रश्नांचा भडिमार करून त्यांना भंडावून सोडले. याबाबतची चित्रफीत कामरा याने ट्विटरवर टाकल्यानंतर समाजमाध्यमांत त्याचे पडसाद उमटले.

कोणत्या विमान कंपन्यांनी घातली बंदी?

या संपूर्ण घटनेचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटल्यानंतर ‘इंडिगो’ने कामरा याच्यावर प्रवासबंदी घालण्याचा निर्णय घेतला. सहप्रवाशाशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत ‘इंडिगो’ने ही कारवाई केली. ‘इंडिगो’पाठोपाठ ‘स्पाईसजेट’, ‘एअर इंडिया’ आणि ‘गोएअर’ या विमान कंपन्यांनीही कामरावर प्रवासबंदीचा निर्णय घेतला. ‘एअर एशिया’ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सूचना मिळाल्यानंतर कुणाल कामरा याच्याबाबत योग्य ती कारवाई करू, असे स्पष्ट केले तर ‘विस्तारा’ने या घटनेचा पूर्ण आढावा घेतल्यानंतरच पुढील पावले उचलली जातील, असे सांगितले.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री म्हणतात…

हा प्रकार चुकीचा असून, अशा घटनांमुळे सहप्रवाशांना त्रास होतो, असे सांगत केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इतर विमान कंपन्यांनीही कामरा याच्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विमान कंपनीविरोधात हॅशटॅग

या प्रकाराचे समाजमाध्यमावर पडसाद उमटले. एकीकडे कामरा याच्या वर्तनावर नाराजी तर दुसरीकडे त्याच्यावर थेट प्रवासबंदीची कारवाई का करण्यात आली, असा सवाल करण्यात येत आहे. #बॉयकॉटइंडिगो हा हॅशटॅगही चर्चेत आला होता.

कुणाल कामराचे म्हणणे काय?

“अर्णब गोस्वामी यांच्या वृत्तवाहिनीने रोहीत वेमुलाच्या मृत्यूनंतर केलेल्या वार्ताकनाची ही प्रतिक्रिया होती. मी कोणतीही विध्वंसक कृती केलेली नाही. मात्र, हवाई कंपन्यांनी केलेल्या प्रवासबंदीच्या कारवाईबद्दल आश्चर्य वाटत नाही,” असं मत कामराने व्यक्त केलं आहे. कुणालने इंडिगोच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितल्याचेही या प्रकरणानंतर म्हटले होते. “अप्रत्यक्षपणे माझ्यामुळे कंपनीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो,” असं कुणालने म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kunal kamra slaps legal notice on indigo seeks rs 25 lakh for mental pain scsg

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य