हरियाणातील कुरुक्षेत्रमध्ये एका ज्येष्ठ वकिलाच्या घरावर चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच घरात मार्च महिन्यातही ५० लाखांच्या चोरीचा प्रयत्न झाला होता. यावेळी आरोपींनी घरातील वृद्ध दाम्पत्याला बांधून ठेवत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आणि इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे ३.१५ कोटींचा ऐवज लुटल्याचे पोलिसांनी सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

श्वानाला फिरवून परतले अन् घरातील दृश्य पाहून धक्का

ही घटना गुरुवारी रात्री घडली. वरिष्ठ वकील बलवंत सिंह वालिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते रात्री साडेनऊच्या सुमारास पाळीव श्वानाला फिरवण्यासाठी घराबाहेर गेले होते. रात्री सुमारे १० वाजता ते घरी परतले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांच्या पत्नीला बेडवर उलटे झोपवून हात-पाय दोरीने बांधण्यात आले होते आणि त्यांच्या तोंडावर चिकटपट्टी लावण्यात आली होती.

वृद्ध दाम्पत्याला धमकावून चोरी

दरोडेखोरांनी वकिलालाही पकडून बांधून ठेवले आणि दोघांनाही बंदुकीचा धाक दाखवत पैशांची व मौल्यवान वस्तूंची मागणी केली. त्यांनी दाम्पत्याला धमकावत डिजिटल लॉकर उघडण्यास भाग पाडले. तक्रारीनुसार, दरोडेखोरांनी सांगितले की, २० मार्च रोजी याच घरात झालेल्या सुमारे ₹५० लाखांच्या चोरीमागे तेच होते. त्या वेळी डिजिटल लॉकर उघडण्यात त्यांना अपयश आले होते. त्यामुळे यावेळी लॉकरमधील मौल्यवान वस्तू घेण्यासाठी ते पुन्हा आले असल्याचे त्यांनी सांगितले.

१७ ते २० लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने लंपास

जीवाच्या भीतीने वालिया यांनी दोन्ही डिजिटल लॉकर उघडले. त्यानंतर आरोपींनी सुमारे १७ ते २० लाखांची रोकड, १.५ ते २ किलो सोन्याचे दागिने, सुमारे ४ किलो चांदीचे दागिने, चांदीची भांडी, मूर्ती, परवाना असलेली रिव्हॉल्वर, काडतुसे आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. घरातील चार सीसीटिव्ही कॅमेरेही आरोपींनी फोडले. एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटिव्हीचे डीवीआरदेखील बरोबर घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

‘आणखी ८० लाख द्या, नाहीतर ठार करू’

दरोडेखोरांनी वकिलाकडे आणखी ८० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. पोलिसांना माहिती दिल्यास दोघांना ठार करण्याची धमकीही त्यांनी दिली. घराबाहेर पडण्यापूर्वी आरोपींनी मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि ते पसार झाले. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातील चार सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि त्यांचा डीव्हीआरही बरोबर नेला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आणखी ८० लाखांची मागणी केली आणि पोलिसांना माहिती दिल्यास दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. नंतर आरडाओरड ऐकून शेजारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वृद्ध दाम्पत्याची सुटका करून पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांकडून सीसीटिव्ही फुटेजची तपासणी

पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. ठाणेसर सिटी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील दरोडा, धमकी आणि इतर कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शहरातील विविध ठिकाणांचे सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपींच्या हालचालींचा माग काढला जात आहे. वकिलाच्या घराबाहेर सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. याच घरात मार्च महिन्यात चोरीचा प्रयत्न झाल्याची नोंद पोलिसांकडे आधीपासून आहे. त्या प्रकरणातही गुन्हा दाखल असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कुरुक्षेत्रचे काँग्रेस आमदार आणि माजी हरियाणा मंत्री अशोक अरोरा यांनी या घटनेवरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कुरुक्षेत्र हे पूर्वी हरियाणातील शांत शहरांपैकी एक मानले जात होते; मात्र आता गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली.