पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. कुशीनगर या प्राचीन शहरामध्येच गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. या विमानतळामुळे बौद्धांच्या तीर्थयात्रांना चालना मिळेल, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. “कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा अनेक दशकांच्या महत्वाकांक्षा आणि प्रयत्नांचा परिणाम आहे. माझा आनंद आज द्विगुणीत झाला आहे. पूर्वांचलच्या लोकांप्रती असलेली वचनबद्धता पूर्ण करण्याचा हा क्षण आहे,” असे पतप्रधान मोदी म्हणाले. कुशीनगर विमानतळ हे उत्तर प्रदेशमधील तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मोदी म्हणाले की, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई जोडणी म्हणून राहणार नाही, तर ते व्यवसाय आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान म्हणाले की कुशीनगरचा विकास उत्तर प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारसाठी प्राधान्य आहे. त्यामुळे भविष्यात भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणे विकसित करणे, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि बौद्ध भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. एअर इंडिया टाटा समूहाने विकत घेतल्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, “या निर्णयामुळे भारताच्या हवाई क्षेत्राला मोठी चालना मिळेल. देशातील उड्डयन क्षेत्र व्यावसायिकपणे चालले पाहिजे, तसेच सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे.”

या विमानतळाच्या उद्घाटन समारंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री नमल राजपक्षे यांच्या नेतृत्वाखाली १३० सदस्यीय शिष्टमंडळ उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kushinagar airport will boost buddhist pilgrimage says pm modi hrc
First published on: 20-10-2021 at 12:08 IST