Made in Pakistan Ceiling Fan UP: उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एका मदरशाची सध्या चर्चा आहे. या मदरशामधील छताला लावलेला पंखा दुरुस्तीला दिल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. हा पंखा भारतीय कंपन्यांचा नव्हता. या पंख्याच्या मोटरवर ‘मेड इन पाकिस्तान’ असे लिहिलेले आढळले. त्यामुळे दुरुस्ती करणाराही गोंधळून गेला. या पंख्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. एका धार्मिक आस्थापनेत पाकिस्तानी बनावटीचा पंखा आढळून आल्यामुळे हा विषय आजूबाजूच्या परिसरात चर्चेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या इलेक्ट्रिशियनने पंखा दुरूस्त केला, त्यानेच हा फोटो काढल्यानंतर तो व्हायरल झाला असावा.
कुशीनगर जिल्ह्यांचे प्रांत अधिकारी जयंत यादव म्हणाले, पोलिसांना मदरशाचा व्यवस्थापक युनुस अन्सारीची चौकशी केली. त्यांनी म्हटले की, हा पंखा एका स्थानिक रहिवाशाने दान केला होता. यानंतर पोलिसांनी त्या रहिवाशाला शोधून काढत त्याचीही चौकशी केली. या रहिवाश्याने सांगितले की, त्याच्या मुलाने हा पंखा पाठवला होता. हा मुलगा सौदी अरेबियात स्थायिक असून त्याने हा पंखा तिथून पाठवला होता. त्यानंतर २०२३ मध्ये सदर पंखा मदरशाला देण्यात आला.
यानंतर पोलिसांनी सदर मुलाशीही संपर्क साधला. त्याने सांगितले की, २०२० मध्ये सदर पंखा सौदी अरेबियात विकत घेतला होता. त्यानंतर तो त्याच्या वडिलांसाठी भारतात पाठवला. प्रांत अधिकारी यादव पुढे म्हणाले, मुलाने पंखा विकत घेतल्याचे बिलही सादर केले. आम्ही या बिलाची तपासणी करत आहोत. तसेच पंखा भारतात आणताना कस्टम ड्युटी भरली गेली होती का? हेही तपासले जात आहे.
अद्याप खटला दाखल नाही?
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. मदरशामधील शिक्षक ममेराजुद्दीन अन्सारी यांनी सांगितले की, सदर पंखा बऱ्याच दिवसांपासून बंद होता, त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी इलेक्ट्रिशियनकडे देण्यात आला.
त्या पंख्यावर मेड इन पाकिस्तान लिहिले आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती. प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, मात्र त्यातून काही संशयास्पद आढळून आले नाही. अन्सारी यांनी पुढे सांगितले की, सदर मदरसा १९९४ पासून लोकवर्गणीतून चालवला जात आहे. पूर्वी मदरश्यात बरेच शिक्षक आणि विद्यार्थी होते. मात्र निधी ओघ आटल्यानंतर बरेच जण सोडून गेले. अन्सारी आता एकटेच ५० विद्यार्थ्यांना शिकवतात.
