Major friendly fire incident : इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. अमेरिकेची तीन ‘F-15E’ लढाऊ विमाने कुवेतच्या हवाई संरक्षण दलाने (Air Defence) चुकून पाडली आहेत. ही घटना ‘फ्रेंडली फायर’असल्याचे अमेरिकन लष्कराने सोमवारी स्पष्ट केले. इराणमध्ये सुरू असलेल्या लष्करी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी ही विमाने उड्डाण करत होती. त्यापूर्वी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये अमेरिकेची विमाने आगीच्या ज्वाळांत जमिनीवर कोसळताना दिसत होती. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इराण-अमेरिकेत युद्धस्थिती

इराणसोबतचा अमेरिकेचा संघर्ष आता युद्धात रूपांतरित होत आहे. शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक महत्त्वाचे राजकीय आणि लष्करी अधिकारी मारले गेले. या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे.

अमेरिकेची लढाऊ विमाने कुवेतने पाडली

सोमवारी कुवेत सरकारने त्यांच्या देशात अमेरिकेची काही विमाने कोसळल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच अमेरिकन सेंट्रल कमांडने (Centcom) निवेदन प्रसिद्ध केले. यात म्हटले आहे की, “इराण मोहिमेवर असलेली तीन F-15E लढाऊ विमाने कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमने चुकून पाडली. हा प्रकार तांत्रिक गोंधळातून किंवा त्रुटीमुळे झाला असावा.”

अमेरिकेकडून स्पष्टीकरण

घटनेच्या कारणांचा तपास सुरू असल्याचे स्पष्ट करत, अमेरिकन सेंट्रल कमांडने (Centcom)अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटलंय की, “१ मार्च रोजी रात्री ११:०३ वाजता (ET), ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ला (Operation Epic Fury) पाठिंबा देण्यासाठी उड्डाण करणारी अमेरिकेची तीन ‘F-15E स्ट्राईक ईगल्स’ लढाऊ विमाने कुवेतच्या हद्दीत कोसळली. हा प्रकार प्रामुख्याने ‘फ्रेंडली फायर’ (मित्राकडून झालेला चुकीचा हल्ला) असल्याचे दिसून येत आहे.”

“इराणी विमाने, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांविरुद्ध सुरू असलेल्या सक्रिय युद्धादरम्यान (Active Combat), कुवेतच्या हवाई संरक्षण दलाकडून (Air Defenses) चुकीने अमेरिकन हवाई दलाची ही लढाऊ विमाने पाडली गेली”, असंही त्यात म्हटलं आहे.

“विमानातील सहाही कर्मचारी (Aircrew) सुदैवाने सुरक्षितपणे बाहेर पडले (Eject) असून त्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. कुवेतने या दुर्घटनेची कबुली दिली असून, या मोहिमेत कुवेतच्या संरक्षण दलांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या प्रकरणाच्या कारणांचा तपास सुरू असून, अधिक माहिती उपलब्ध होताच ती प्रसिद्ध केली जाईल,” असे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केले.