Kuwait Iran Attack Indian Worker Death News: पश्चिम आशियातील युद्ध आता अधिक भीषण बनले असून त्याचा थेट फटका भारतीय नागरिकांना बसत आहे. सोमवारी पहाटे कुवेतमध्ये एका वीज आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाला. या ताज्या घटनेमुळे या युद्धात जीव गमावलेल्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या आता आठ झाली आहे.

पाणी शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य

कुवेतच्या वीज आणि पाणी मंत्रालयाने ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, इराणी हल्ल्यात प्रकल्पातील एका सेवा इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्रालयाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, याला “पापी इराणी आक्रमण” असे संबोधले आहे. तांत्रिक आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली असून, पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भारतीयांची वाढती जीवितहानी

गेल्या गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका भारतीयाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कुवेतमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. शुक्रवारी सरकारने दिलेल्या माहितीनुसार सात भारतीयांचा मृत्यू झाला होता आणि एक जण बेपत्ता होता. मात्र, सोमवारच्या या घटनेने मृतांचा आकडा आठ झाला असून भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे.

आखातात हवाई हल्ल्यांचे सायरन

अल जझीराच्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे केवळ कुवेतच नव्हे, तर बहरीन, युएई आणि सौदी अरेबियामध्येही हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. बहरीनमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले असून, सुरक्षा दलांनी इराणी क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेले हे युद्ध आता पाचव्या आठवड्यात पोहोचले आहे.

जागतिक बाजारपेठेत उलथापालथ

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने मध्यस्थीची चर्चा केली असली, तरी जमिनीवर युद्ध सुरूच आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक तेल आणि वायू वाहतुकीवर परिणाम झाला असून ऊर्जेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दरम्यान, अमेरिका या प्रदेशात ‘मरीन’ सैनिकांसह हजारो अतिरिक्त सैनिक पाठवण्याच्या तयारीत असून तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.