Kuwaiti civilian helping US pilot: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका नव्या व्हिडिओ फुटेजमध्ये कुवेती नागरिक एका अमेरिकन महिला वैमानिकाकडे जाताना दिसतो. कुवेती हवाई संरक्षण दलाकडून चुकून पाडण्यात आलेल्या तीन अमेरिकन लढाऊ विमानांपैकी एका विमानातील ही वैमानिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे वर्णन ‘पेंटागॉन’ने ‘मैत्रीपूर्ण गोळीबाराची घटना’ असे केले आहे.
“तुम्ही ठीक आहात का?”
सुमारे २० सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये दिवसा उजाडलेल्या वाळवंटी भागात गणवेशधारी महिला पायलट जमिनीवर बसलेली दिसते. एक नागरिक तिच्याकडे येत इंग्रजीत “तुम्ही ठीक आहात का?” अशी विचारपूस करतो आणि “आम्हाला मदत केल्याबद्दल धन्यवाद” असे म्हणतो. पायलट जागरूक आणि स्थिर अवस्थेत दिसते, काही क्षणी ती हलकेसे हसतानाही दिसते. कॅमेऱ्याबाहेर किमान आणखी एक आवाज ऐकू येतो, मात्र प्रत्यक्ष दृश्यात केवळ एकच नागरिक पायलटकडे जाताना स्पष्ट दिसतो. पुढे काय घडले, हे या व्हिडिओत दाखवलेले नाही. हा व्हिडिओ ‘नो फिल्टर’ या ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, इराणविरोधातील कारवाईत सहभागी असलेली तीन एफ-१५ स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने कुवेती हवाई संरक्षण यंत्रणेने चुकून पाडल्याची पुष्टी सोमवारी पेंटागॉनने केली. सर्व सहा क्रू मेंबर्सनी सुरक्षितपणे इजेक्ट केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) दिली.
कुवेतमध्ये मैत्रीपूर्ण गोळीबार
इराणकडून अमेरिकन लष्करी तळ असलेल्या आखाती लक्ष्यांवर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि विमाने डागण्यात आली होती. त्यावेळी तीव्र हवाई हालचाली सुरू असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित हवाई संरक्षण प्रणालीबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसला तरी कुवेतमध्ये अमेरिकन बनावटीच्या पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली तैनात आहेत. मैत्रीपूर्ण आगीच्या घटना तुलनेने दुर्मिळ असल्या तरी अत्यंत तणावपूर्ण आणि अतिदक्षतेच्या परिस्थितीत अशा चुका घडल्याची उदाहरणे यापूर्वीही आहेत. सेंटकॉमने संबंधित जेट्स मैत्रीपूर्ण गोळीबाराचे बळी ठरल्याची पुष्टी केली आहे.
उपलब्ध फुटेजनुसार, एक ट्विन-इंजिन लढाऊ विमान आगीच्या ज्वाळांनी वेढले गेलेले दिसते आणि काही क्षणांत ते कोसळताना दिसते. प्राथमिक विश्लेषणानुसार हे विमान कुवेतमधील अमेरिकेच्या प्रमुख तळांपैकी एक असलेल्या अली अल सलेम हवाई तळापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर कोसळले.
दरम्यान, कुवेत इंटिग्रेटेड पेट्रोलियम इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मिना अल अहमदी रिफायनरी परिसरात विमानाचे काही अवशेष पडले असून दोन कामगार जखमी झाले आहेत. आपत्कालीन पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
