भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हिडीओ तेलंगणात शेतकरी रॅली सुरू होण्याआधीचा आहे. यामध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान आजचा विषय काय? मला काय बोलायच आहे? असा प्रश्न राहुल सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भाजपा नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच ‘जेव्हा तुम्ही वैयक्तिक परदेशी सहली आणि नाईट क्लबिंगच्या मध्ये राजकारण करता तेव्हा असं होतं’, असा टोलाही मालवीय यांनी राहुल गांधींना लगावला आहे. याआधीही मालवीय यांनी राहुल गांधीचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ते नेपाळच्या एका नाईटक्लबमध्ये दिसून आले होते. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. या व्हिडीओवरून राहुल गांधीवर भाजपाने टीकास्त्र सोडले होते.

टीआरएस सोबत हातमिळवणी नाही

राहुल गांधी सध्या दोन दिवसाच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. तेलंगणात काँग्रेसची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारंगलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला राहुल गांधीनी संबोधित केले. यारदम्यान त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीकाही केली. एवढचं नाही तर काँग्रेस टीआरएस सोबत हातमिळवणी करणार नसल्याचंही स्पष्ट केले आहे.