नरेंद्र मोदी यांचे प्रस्थ वाढण्यास लालकृष्ण अडवाणीच जबाबदार आहेत, अशी टीका पेट्रोलियममंत्री विराप्पा मोईली यांनी केली आहे. देशासाठी मोदी काय किंवा अडवाणी, दोघेही अयोग्य आहेत. राहुल गांधी आणि मोदी यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे मोईलींनी सांगितले.
भाजप हा काँग्रेससारखा सर्वसमावेशक पक्ष नसल्याचा दावा मोईलींनी केला. भाजपला मोदींचे नेतृत्व म्हणजे आणखी विचित्र स्थिती असल्याची टिप्पणी मोईलींनी केली. २०१४ ची सार्वत्रिक निवडणूक राहुल गांधी यांच्या विरोधात नरेंद्र मोदी अशी होणार काय, असे विचारता आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे मोदी प्रचारप्रमुख झाल्यावर अल्पसंख्याकांची मते त्या पक्षाला मिळणार नाहीत, असा दावाही मोईली यांनी केला. मोदींना बढती मिळणे भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी चांगले नाही हे आपण नव्हे, तर अडवाणींचे मत असल्याचे मोईलींनी निदर्शनास आणून दिले.
अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये राजनाथ सिंह यांना मुसोलिनी, तर मोदींना हिटलरची उपमा दिल्याचे मोईलींनी सांगितले. काँग्रेसचा अडवाणी आणि मोदी या दोघांनाही विरोध आहे. दोघेही देशासाठी अयोग्य असल्याचे मोईली म्हणाले. गोध्रा दंगे विसरणे कठीण आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे हे नेते चालणार नाहीत, असे मोईलींनी सांगितले.