उत्तराखंडमधील पुरपरिस्थितीत अडकलेल्यांची सुटका करण्याचे कार्य सुरू असून, अजूनही चाळीस हजार यात्रेकरूंना येत्या दोन दिवसांत वाचविण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राहतकार्य करणाऱ्या संस्थांमध्ये समन्वयाचा अडथळा येत असल्याचेही ते म्हणाले. ” ही मानव निर्मित आपत्ती नसून नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे आपत्ती विभाग, लष्कर आणि अडकलेले यात्रेकरू यांच्यामध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे आहे.” असे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जवळपास ७२,००० जणांना वाचविण्यात यश आल्याचेही शिंदे म्हणाले. त्याचबरोबर “अडकलेल्यांना वाचविणे ही प्राथमिकता आहे. त्यानुसार लष्कर प्रयत्न करत आहे. मदतकार्यात अनेक मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्यासाठीचेही प्रयत्न सुरू आहेत. काही मृतदेह ओळखपटविता येणार नाही अशा अवस्थेत सापडले असल्यामुळे त्यांच्या ‘डीएनए’चे जतन करण्याचेही आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.” असे सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.