घरकाम करणाऱ्या दोन नेपाळी महिलांवर बलात्कार करून त्यांचा छळ केल्याचा आरोप सौदी अबेरियाच्या मुत्सद्दय़ावर असून त्याप्रकरणी करण्यात येणाऱ्या चौकशीत सहकार्य करावे, अशी विनंती भारताने सौदी अरेबियाकडे केली आहे.

सौदी अरेबियाचे राजदूत सौद मोहम्मद अलसाती यांना गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले. हरयाणा पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य हवे आहे, असे त्यांना सांगण्यात आले. पोलिसांकडून परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्य राजशिष्टाचार अधिकाऱ्यांनी सौदी अरेबियाच्या राजदूतांना पाचारण केले आणि हरयाणा पोलिसांनी केलेली विनंती त्यांना सांगितली, असे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. गुरगाव पोलिसांनी बुधवारी रात्री या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मंत्रालयाकडे पाठविला आहे.
सदर दोन नेपाळी महिलांची दुसरी वैद्यकीय चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर हा अहवाल पाठविण्यात आला आहे.
सौदी अरेबियाच्या दूतावासाकडून या प्रकरणाबाबत बुधवारी एक निवेदन जारी करण्यात आले होते आणि मुत्सद्दय़ावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे त्यामध्ये म्हटले होते. एका राजकीय मुत्सद्दय़ाच्या घरात घुसण्याच्या पोलिसांच्या कृतीबद्दल दूतावासाने निषेध नोंदविला होता.
दरम्यान, महिला हक्क कार्यकर्त्यांनी सौदी दूतावासाबाहेर निदर्शने करून संबंधित मुत्सद्दय़ाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर मुत्सद्दय़ाला कोणतेही राजनैतिक संरक्षण दिले जाऊ नये, अशी मागणीही या वेळी महिलांनी केली.