Bhopal Farmer Protest Bus Viral Video: नीट पेपरफुटीविरोधात देशभर आंदोलनं सुरु असताना मुंबईत देखील निदर्शने झाली, यावेळी एक महिला पोलिसांच्या वाहनासमोर उभी राहिली. या महिलेचा फोटो देशभर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि या महिलेच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर आता मध्य प्रदेशातून एक फोटो समोर आला आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या शेतकरी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनातून एका महिला पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भोपाळमधील व्हिडीओ व्हायरल
मध्य प्रदेशमध्ये शेतकरी विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. दरम्यान, यावेळी आंदोलकांनी रस्त्यातील बस ढकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला पोलिस अधिकारी बस समोर उभी ठाकली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मोनिका शुक्ला असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून, त्या वाहतूक आणि गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर कार्यरत आहेत.
लेडी सिंघम अशी ओळख
मोनिका शुक्ला यांची भोपाळच्या लेडी सिंघम अशी ओळख आहे. शेतकरी आंदोलनातील त्यांची कृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच, त्यांच्या या धाडसासाठी कौतुक देखील होत आहे. शुक्ला यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. “आंदोलक शेतकऱ्यांना शहरात प्रवेश करु देण्यास रोखणे माझं काम होतं, आणि माझं काम करत होते, त्यांना बस ढकलण्यापासून रोखत होते”, असे शुक्ला म्हणाल्या.
व्हिडीओ चर्चेत
“शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी स्कूल बस अतिरिक्त बॅरिकेड्स म्हणून लावली होती. आंदोलक शेतकऱ्यांनी बस ढकलून बॅरिकेड्स हटविण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी बस पुढे ढकलण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना रोखण्यासाठी मी बसच्या समोर उभी राहिले,” असे प्रसंगाचे कथन शुक्ला यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केले. शुक्ला बसच्या पुढे उभ्या राहिल्यानंतर आंदोलकांनी बसपासून दूर जाण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मोनिका शुक्ला काय म्हणाल्या?
“मी बसच्या समोर उभं रहायचा निर्णय घेतला, मी घाबरले नाही, मला करायला हवं होत ते केलं. आंदोलक गुन्हेगार नाहीत, ते नागरिक असून, त्यांच्या मागण्या मांडत आहेत. या आंदोलनाला नेता नाहीये, पण मोठ्या संख्येने आंदोलक शहरात येत आहेत. या दृष्टीने शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याचा माझा प्रयत्न होता”, असे मोनिक शुक्ला म्हणाल्या.
