LaGuardia Airport Accident latest updates on Air Canada flight 8646 and rescue truck collision : न्यूयॉर्कच्या लगार्डिया विमानतळावर सोमवारी एअर कॅनडाचे विमान धावपट्टी ओलांडत असलेल्या एका ट्रकला धडकल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत विमानेचे दोन्ही वैमानिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या अपघाताशी संबंधीत एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अधिकारी अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी एअर ट्राफीक कंट्रोलर ट्रक चालकाला कथितपणे थांबण्यास सांगताना ऐकू येत आहे. व्हारल होत असलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये हा अधिकारी, “ट्रक १ आणि कंपनी लागार्डिया टॉवर हे डेल्टा येथील ४ क्रॉस (रनवे) करण्याची परवानगी मागत आहेत,” असे म्हणताना ऐकू येत आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये काय ऐकू येत आहे?

व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषण स्पष्टपणे ऐकू येत आहे. “ट्रक अँड कंपनी क्रॉसिंग ४,” असे अधिकारी म्हणतो. यानंतर ट्राफिक कंट्रोलर म्हणतो की, “फ्रंटियर ४१९५, कृपया तिथेच थांबा.”

“स्टॉप, स्टॉप, स्टॉप, स्टॉप, ट्रक १, स्टॉप, स्टॉप, स्टॉप, स्टॉप, ट्रक १, स्टॉप,” असे कंट्रोलर भीताने ओरडताना क्लीपमध्ये ऐकू येते. यानंतरच विमानाचा अपघात झाला असावा असे सांगितले जात आहे. त्यानंतर ट्रॅफिक कंट्रोलर ‘डेल्टा २६०३’ ला ‘गो अराउंड’ असे सांगतो.

“जेट ६४६, जेट ६४६, मी तुमची वाहनाला धडक बसताना पाहतो आहे. जागेवर थांबा, मला माहिती आहे तुम्ही हलू शकत नाहीत. ते वाहन तुम्हाला आता प्रतिसाद देत आहे,” असे कंट्रोलरने एअर कॅनडाच्या विमानातील वैमानिकांना सांगितल्याचे क्लीपमध्ये ऐकू येत आहे. दरम्यान या ऑडिओ क्लीपच्या सत्यतेबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान तो ट्रक हा पोर्ट ऑथॉरिटीचे एअरक्राफ्ट रेस्क्यू अँड फायरफायटींगचे वाहन होते. हे वाहन एका वेगळ्या घटनेतील बचावकार्यासाठी जात होते, असे विमानतळाकडून एक्सवर पोस्ट करत सांगण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा ट्रक धावपट्टी ओलांडून युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाकडे जाण्याच्या प्रयत्नात होता. युनायटेड ७३७ मॅक्स (United 737 Max) विमानाने ग्राउंड एमर्जन्सी जाहीर केली होती. विमानात एक विचित्र वास येत असल्याने विमानातील कर्मचारी अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे त्यांनी अग्निशमन दलाच्या गाड्यांची मागणी केली होती.

एअर कॅनडा एक्सप्रेसची प्रादेशिक भागीदार जॅझ एव्हिएशनकडून चालवले जाणारे फ्लाइट ८६४६ हे विमान मॉन्ट्रियलवरून येत होते, ज्याची रनवेवर ट्रकला धडक बसली.

सीआरजे-९०० या विमानात ७२ प्रवासी आणि ४ क्रू मेंमर होते. या दुर्घटनेत विमानाचे दोन्ही वैमानिक गंभीर जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.