फाळणीच्या भीषण जखमा आणि तब्बल आठ दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताने आपल्या सांस्कृतिक राजधानीचा म्हणजेच लाहोरचा गमावलेला इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लाहोरमधील ज्या रस्ते, गल्ल्या आणि चौकांची नावे फाळणीनंतर बदलून इस्लामिक किंवा पाकिस्तानी नेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली होती, त्यांना आता पुन्हा त्यांची जुनी आणि मूळ हिंदू, शीख, जैन तसेच ब्रिटिशकालीन नावे दिली जात आहेत.
या ऐतिहासिक निर्णयामुळे लाहोरमधील प्रसिद्ध ‘इस्लामपुरा’ आता पुन्हा एकदा ‘कृष्ण नगर’ म्हणून ओळखले जाईल. तर ‘बाबरी मशीद चौक’ शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या आपल्या जुन्या ‘जैन मंदिर चौक’ या नावाने दिमाखात उभा राहणार आहे.
‘या’ ९ ऐतिहासिक ठिकाणांना मिळाली मूळ ओळख
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पंजाब सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लाहोर आणि आसपासच्या परिसरातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या दोन महिन्यांत लाहोरच्या अनेक भागांत जुन्या नावांचे नवीन फलक (Signboards) लावण्यात आले असून, आतापर्यंत अधिकृतपणे ९ ठिकाणांना त्यांची मूळ ओळख परत मिळाली आहे. यामध्ये प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे:
- इस्लामपुराचे नाव आता पुन्हा ‘कृष्ण नगर’ झाले आहे.
- बाबरी मशीद चौक आता ‘जैन मंदिर चौक’ म्हणून ओळखला जाईल.
- सुन्नत नगर चे नाव बदलून ‘संत नगर’ करण्यात आले आहे.
- मुस्तफाबाद आता पुन्हा ‘धरमपुरा’ झाले आहे.
- मौलाना जफर अली खान चौक ला त्याचे मूळ नाव ‘लक्ष्मी चौक’ परत मिळाले आहे.
- सर आगा खान रोड आता पुन्हा ‘डेव्हिस रोड’ झाला आहे.
- फातिमा जिना रोडचे नाव बदलून ‘क्वीन्स रोड’ करण्यात आले आहे.
- प्रसिद्ध ‘बाग-ए-जिना’ बाग आता ब्रिटिशकालीन ‘लॉरेन्स गार्डन्स’ या नावाने ओळखली जाईल.
कागदावर नावे बदलली, पण लाहोरकरांच्या मनातून पुसली नाहीत!
विशेष म्हणजे, प्रशासनाने जरी दशकांपूर्वी ही नावे बदलली होती, तरी लाहोरच्या सामान्य जनतेने जुनी नावे कधीच सोडली नव्हती. ‘द प्रिंट’शी बोलताना लाहोरच्या वॉल सिटीचे माजी महासंचालक कामरान लशारी म्हणाले, “सरकारी कागदपत्रांवर नावे काहीही असली, तरी स्थानिक लोक, रिक्षाचालक, दुकानदार आणि चहावाले नेहमी जुन्या नावांचाच वापर करायचे. लोकांसाठी लक्ष्मी चौक हा नेहमी लक्ष्मी चौकच राहिला. लाहोरची ओळख ही मुस्लिम, शीख, हिंदू, ख्रिश्चन आणि ब्रिटिश संस्कृतीच्या मिलाफातून तयार झाली आहे, ती कोणालाही नाकारता येणार नाही.”
महाराजा रणजीत सिंग यांच्या काळातील वारसाही होणार जिवंत
१९४७ च्या फाळणीपूर्वी अमृतसरपासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेले लाहोर हे सर्वधर्मीय पंजाब्यांचे सांस्कृतिक माहेरघर होते. फाळणीच्या हिंसाचारात हिंदू आणि शीख कुटुंबे देशोधडीला लागली आणि हळूहळू येथील मंदिरांचा, गुरुद्वारांचा आणि ऐतिहासिक स्थळांचा चेहरामोहरा बदलण्यात आला.
परंतु आता बदलत्या काळात पाकिस्तान सरकारने आपला ऐतिहासिक दृष्टिकोन अधिक व्यापक केला आहे. सध्या लाहोरमधील डझनभर ब्रिटिशकालीन आणि शीख साम्राज्याशी संबंधित वास्तूंचे पुनरुज्जीवन केले जात आहे. लाहोर किल्ल्यात शीख राजघराण्याच्या शेवटच्या वंशज प्रिन्सेस बंबा सदरलँड यांचे जुने पेंटिंग पूर्ववत करण्यात आले आहे. यापूर्वी महाराजा रणजीत सिंग यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती, मात्र आता पाकिस्तानातील सामाजिक वातावरण अधिक सर्वसमावेशक होत असल्याचे लशारी यांनी आवर्जून सांगितले.
मिंटो पार्कच्या कुस्तीचा आखाडा आणि क्रिकेटचे मैदानही परतणार!
या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत केवळ रस्तेच नाही, तर लाहोरचा क्रीडा इतिहासही जिवंत केला जात आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लाहोरमधील ऐतिहासिक क्रिकेट मैदाने आणि मिंटो पार्क (आताचे ग्रेटर इक्बाल पार्क) येथील जुना कुस्तीचा आखाडा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
फाळणीपूर्वी याच मैदानात भारताचे महान क्रिकेटपटू लाला अमरनाथ आणि पाकिस्तानचे इंझमाम-उल-हक यांसारख्या खेळाडूंनी सराव केला होता. तसेच, याच मैदानावरील आखाड्यात जगज्जेते गामा पैलवान आणि इमाम बख्श यांच्या कुस्तीच्या कडाडणाऱ्या शिट्ट्या घुमल्या होत्या. फाळणीपूर्वी लाहोरमधील हिंदू कुटुंबे याच मिंटो पार्कमध्ये दरवर्षी दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचे, त्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे.
