लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे उत्तर प्रदेमध्ये आंदोलनांनी वेग पकडला आहे. लखीमपूर खेरीच्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.

सपा प्रमुख अखिलेश यादव लखनऊमध्ये त्यांच्या घराजवळ आंदोलनासाठी बसले होते. अखिलेश यादव यांना हजरतगंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अखिलेश यादव लखीमपूर खेरीला जात असताना त्यांना यूपी सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली आहे. ही घटना घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर घडली जिथे अखिलेश यादव त्याच्या निवासस्थानाजवळ आंदोलनासाठी बसले होते. एका व्हिडिओमध्ये, पोलिस आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. “हे कोणी केले माहित नाही. आम्ही आत गेलो तेव्हा कोणीतरी हे केले,” असे एका पोलीसाने म्हटले आहे.

“हे सरकार शेतकर्‍यांवर ज्या प्रकारचे अत्याचार करत आहे, तसे अत्याचार इंग्रजांनी सुद्धा केले नाहीत. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री (केशव प्रसाद मौर्य) यांनी राजीनामा द्यावा. मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दोन कोटी रुपये आणि सरकारी नोकऱ्या दिल्या पाहिजेत,” असे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.