लखनौ : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा याला याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर, रविवारी आशिष हा लखीमपूर खेरी दंडाधिकारी न्यायालयात शरण आला. त्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात नेण्याल आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने सहा दिवसांपूर्वी आशिष याचा जामीन रद्द केला होता. आशिष हा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आहे. गत ऑक्टोबरमध्ये लखिमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आशिष याने वाहन चालविल्याचा आरोप आहे. 

लखिमपूर खेरीचे वरिष्ठ कारागृह अधीक्षक पी. पी. सिंह यांनी सांगितले की, आशिष हा शरण आल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

२ नोव्हेंबरला अजच मिश्रा यांच्या मालकीच्या कारसह तीन वाहनांच्या ताफ्याने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले, असा आरोप आहे. यात चार शेतकरी आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या िहसाचारात भाजपचे दोन कार्यकर्ते आणि मिश्रा यांच्या मालकीच्या वाहनाचा चालकही ठार झाला होता.

पीडितांची बाजू ऐकल्यानंतर जामिनावर निर्णय

१८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने आशिष याला आठवडाभरात शरण येण्यास सांगितले होते. सरन्यायाधीश एन.  व्ही. रमण, न्या. सूर्य कांत आणि न्या. हिमा कोहली यांच्या पीठाने हा आदेश दिला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने आधी आंदोलकांच्या कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यानंतरच आशिष याच्या जामीन अर्जावर नव्याने निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.