केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी रविवारी लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी पोलीस दोषी असल्याचं म्हटलं आहे. या हिंसाचारामध्ये भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांसहीत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. अजय मिश्राच्या मुलाने शेतकरी आंदोलन करत असताना गाडी वेगाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गाडी घुसवल्याचा आरोप केला जात आहे. असं असतानाच आता अजय मिश्रा यांनी यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस जबाबदार असल्याचं म्हटलंय. ज्या पद्धतीने भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली ते दुर्देवी आहे असं मिश्रा म्हणालेत.

पोलीस उपस्थित असतानाही घटनास्थळी ग्या पद्धतीने सर्व काही घडलं ते पाहता हा प्रकार स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचं दर्शवत आहे, असं मिश्रा म्हणाले. शेतकऱ्यांना रस्त्यावर आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आणि नंतर त्या रस्त्यावर साधे बॅरिकेट्सही टाकण्यात आले नाही. श्याम सुंदर निषाद नावाचा भाजपाचा कार्यकर्ता या संघर्षामध्ये जखमी झाल्यानंतर त्याला पोलिसांसमोर रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला ठार मारण्यात आल्याचा दावा मिश्रा यांनी केलीय. दोषी पोलिसांना सोडलं जाणार नाही. सरकारला त्याच्याविरोधात चौकशी केली पाहिजे अशी मागणी मिश्रा यांनी केलीय. सिधा खुर्द गावामधील एका प्रार्थनासभेमध्ये मिश्रा यांनी हे वक्तव्य केलं.

एसआयटी चौकशी सुरु…
केंद्रीय गृहराज्य मंत्री असणाऱ्या मिश्रा यांनी लखीमपुरमधील हिंसेत मरण पावलेले भाजपाचे कार्यकर्ते ओम मिश्रा, श्याम सुंदर निषाद आणि शुभम मिश्रा यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपाचे आमदार योगेश वर्मा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामजी पांड्ये, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय मिश्रांबरोबरच इतर लोकही उपस्थित होते. या प्रकरणामध्ये अजय मिश्रांचा मुलगा आशीष मिश्राला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली असून सध्या एसआयटी चौकशी सुरु आहे. या प्रकरणामध्ये सहा जणांना अटक करण्यात आलीय.

सपाने साधला निशाणा…
“ज्यांच्या मुलाला या प्रकरणामध्ये अटक झालीय ते आता भाजपाच्या योगी सरकारला सांगत आहे की या हिंसाचारासाठी जिल्हाधिकारी, प्रशासन म्हणजेच योगी सरकार दोषी असल्याचं सांगत आहेत. आता भाजपाचे केंद्रीय मंत्रीच योगी सरकावर आरोप करत असतील तर तुम्ही समजू शकता की राज्यात काय परिस्थिती आहे. खरं तर या लोकांना शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नसून येथे जंगलराज सुरु आहे,” अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रवक्ते सुनील सिंह साजन यांनी केलीय.