लखीमपूर खेरी हिंसाचाराचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी लखीमपूर खेरी येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेतली असताना मोदींनी घटनेवर साधं भाष्यही न केल्याने त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. मोदींसह भाजपाचे इतर नेतेही काही भाष्य करत नसल्याने त्यांच्या भूमिकेवरुन प्रश्चचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र अशा प्रकारचे अनेक मुद्दे देशातील इतर भागातही असून वेळीच उपस्थित करत त्यांच्यावरही समान पद्धतीने भाष्य केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

निर्मला सीतारमन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्या आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी घटना घडतील तेव्हा त्या उपस्थित केल्या पाहिजेत असं सांगताना फक्त तिथे भाजपाचं सरकार आहे म्हणून जेव्हा योग्य वाटेल तेव्हा नाही असं सांगत विरोधकांवर निशाणा साधला.

“फक्त भाजपाशासित राज्यात घडलं म्हणून…,” लखीमपूर खेरी हिंसाचारावर निर्मला सीतारमन यांची पहिली प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच इतर वरिष्ठ नेत्यांकडून लखीमपूर हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? तसंच कोणी अशा घटनांबद्दल प्रश्न विचारल्यानतंर बचावात्मक प्रतिक्रिया का दिली जाते? असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “नाही…नक्कीच नाही. बरं झालं तुम्ही अशा एका घटनेचा उल्लेख केलात जी निषेधार्ह आहे. आमच्यातील प्रत्येकाचं हेच मत आहे. अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणीही घडत असून तो माझ्या काळजीचा विषय आहे”.

“भारतातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत. माझी डॉक्टर अमर्त्य सेन यांच्यासह सर्वांना विनंती आहे की, जेव्हा कधी अशा घटना घडतील तेव्हा त्यांच्यावर भाष्य करुन मुद्दा मांडा. फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडलं असेल तेव्हाच योग्य संधी म्हणून तो मांडला जाऊ नये. माझ्या कॅबिनेट सहकाऱ्याचा मुलगा कदाचित अडचणीत आहे, आणि असे गृहीत धरू की प्रत्यक्षात त्यांनीच हे केले आहे आणि इतर कोणी नाही. पण संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुनच न्याय दिला जाईल,” असं निर्मला सीतारमन यांनी यावेळी सांगितलं.

“मी माझा पक्ष किंवा पंतप्रधानांचा बचाव करत आहे यातला भाग नाही. हा देशाचा बचाव आहे. मी देशासाठी बोलत आहे. मी गरीबांना न्याय देण्यासाठी बोलणार. माझी थट्टा होऊ देणार नाही, आणि जर ते थट्टा करत असतील तर मी उभे राहून ‘सॉरी, चला तथ्यांवर बोलू’ असे म्हणणे बचावात्मक असेल. तुमच्यासाठी हेच माझे उत्तर आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

निर्मला सीतारमन यांनी यावेळी सखोल चर्चा केल्यानंतरच कृषी कायदे आणण्यात आल्याचं सांगत समर्थन केलं. अनेक संसदीय समितींनी गेल्या शतकभरापासू यावर चर्चा केल्याचं सांगताना त्यांनी केंद्राने राज्य सरकारांसोबतही चर्चा केल्याचं म्हटलं.