scorecardresearch

अजय मिश्रा यांना जामीनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह ; तपास अहवालाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे व अ‍ॅड. प्रशंत भूषण यांनी हा जामीन रद्द करण्याची मागणी केली

नवी दिल्ली: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष यांना जामीन देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने शवचिकित्सा अहवालासारख्या पुराव्यांची तपशीलवार तपासणी केल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या प्रकरणी आशीष मिश्रा यांना देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमण व न्या. सूर्यकांत यांच्या विशेष खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.

‘कुणी न्यायमूर्ती शवचिकित्सा अहवालासारख्या तपशिलात कसा काय जाऊ शकतात? हे जामिनाचे प्रकरण आहे. अशाप्रकारे त्याची गुणवत्ता तपासणे आणि तपशिलात जाणे जामिनाच्या मुद्दय़ासाठी अनावश्यक आहे’, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

उच्च न्यायालयाने तपास अहवालाकडे दुर्लक्ष केले आणि एफआयआरच्या आधारे आरोपीला जामीन दिला असे सांगून, शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे व अ‍ॅड. प्रशंत भूषण यांनी हा जामीन रद्द करण्याची मागणी केली. राज्य सरकारने हा गुन्हा गंभीर असल्याचे म्हटले, तरी सर्व साक्षीदारांना संरक्षण देण्यात आल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lakhimpur kheri violence sc reserves order on plea challenging ashish mishra s bail zws

ताज्या बातम्या