Lalit Modi Viral Video : आयपीएलचे संस्थापक ललित मोदी आणि विजय मल्ल्या हे दोघे भारतातून फरार आहेत. या दोघांचा एका पार्टीतील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल होता. या व्हिडीओमध्ये विजय मल्ल्याने एक वक्तव्य केलं होतं. ‘आम्ही दोघे भारतातील दोन सर्वात मोठे फरार लोक आहोत’, असं ललित मोदी आणि विजय मल्ल्या हे बोलत असल्याचं व्हिडीओत दिसून आलं होतं. या व्हिडीओत त्यांनी भारताची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं होतं.
त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली होती. या व्हिडीओवर २६ डिसेंबर २०२५ रोजी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर भाष्य करत फरार असलेल्या ललित मोदी आणि विजय मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी राजनैतिक आणि कायदेशीर मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, त्यानंतर आता ललित मोदीने एक्सवर एक पोस्ट शेअर करत त्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. ‘आम्ही दोघे भारतातील दोन सर्वात मोठे फरार लोक आहोत’, या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचं ललित मोदीने म्हटलं आहे. तसेच भारत सरकारबाबत आपल्याला आदर असल्याचंही ललित मोदीने स्पष्ट केलं आहे.
ललित मोदीने काय म्हटलं?
“जर मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. विशेषतः भारत सरकारची. ज्यांच्याबद्दल मला सर्वात जास्त आदर आहे. या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. मात्र, तो अर्थ कधीही तसा लावण्याचा हेतू नव्हता. पुन्हा एकदा मी मनापासून माफी मागतो”, असं ललित मोदीने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ललित मोदीवर काय आरोप आहेत?
ललित मोदीने यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (BCCI) उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. ललित मोदीवर मनी लाँडरिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर ललित मोदीला बीसीसीआयमधून निलंबित करण्यात आलं होतं. आयपीएलच्या २०१० मधील स्पर्धेनंतर ललित मोदीने देश सोडला होता. तेव्हापासून ललित मोदी लंडनमध्ये राहत असल्याचं सांगितलं जातं.
विजय मल्ल्यावर काय आरोप आहेत?
ईडीने आरोप केल्यानुसार, विजय मल्ल्याने बँकांची ६,२०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर व्याजासह सुमारे १५,००० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा आरोप आहे. ईडीने त्याची १४,०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे.
