Lalit Modi made explosive revelations about Sharad Pawar’s dramatic 2005 BCCI presidential win: ललित मोदी! क्रिकेट विश्वात इंडियन प्रीमियर लीगचा आविष्कार करणारी व्यक्ती, अनेक प्रकरणांमुळे वादात असणाऱ्या ललित मोदींनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत विविध खुलासे केले आहेत. २००५ च्या सुमारास शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष व्हावेत यासाठी पडद्यामागे घडलेल्या अनेक रंजक घटना आणि राजकारणावर मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केले.
ललित मोदींचे खुलासे
ललित मोदी हे भारतीय क्रिकेट इतिहासातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांपैकी एक राहिले आहेत, परंतु आयपीएलच्या पायाभरणीतील त्यांचे योगदान नाकारता येणार नाही. दरम्यान, अंतर्गत मतभेद आणि शेवटच्या क्षणी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शरद पवारांचा अध्यक्षपदाचा मार्ग कसा मोकळा झाला? याबाबत ललित मोदींनी आठवणी जागवल्या. यावेळी विरोधकांचे नेतृत्व जगमोहन दालमिया करत होते. रिधिमा पाठक यांच्या युट्यूब चॅनेलवर मोदींनी मुलाखत दिली आहे.
शरद पवारांना गळ आणि पहिला पराभव
“आम्ही शरद पवारांना या पदासाठी निवडणूक लढवण्यास तयार केले. आम्ही आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे गेलो, पण एका मताने आमचा पराभव झाला. कारण तिथं अंतर्गत संघर्ष सुरू होता. आमच्याच माणसांमध्ये अंतर्गत वाद होते. पुणे क्रिकेट असोसिएशनमध्ये अजित शिर्के आणि ज्ञानेश्वर आगाशे यांच्यात मतभेद झाले. दालमिया गटाने आगाशे यांना आपल्या बाजूने वळवले आणि आमचा एका मताने पराभव झाला. ते आमचे हक्काचे मत होते. शेवटच्या क्षणी झालेल्या गुप्त मतदानात आगाशे यांनी बाजू बदलली. पवार साहेब यामुळे खूप नाराज झाले आणि त्यांचे नाराज होणे स्वाभाविक होते,” असे मोदी म्हणाले.
निवडणुकीची पुन्हा तयारी
पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने लढलो. बाकीचे, जसे राजीव शुक्ला, एन. श्रीनिवासन हे सर्व दुसऱ्या बाजूला होते. हा संघर्ष अधिक तीव्र होत गेला. पैशांचा खेळ आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर वाढला होता,” असे या मुलाखतीत बोलताना मोदी म्हणाले. न्यायालयाचे आदेश, राजकीय डावपेच आणि वादविवादांमुळे निवडणुकीला तीव्र स्वरुप प्राप्त झाल्याचे मोदींनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आल्यानंतर तणाव अधिकच वाढल्याचे मोदींनी नमूद केले.

कोलकात्यामधील निवडणूक आणि न्यायालयाची एन्ट्री
“मला आठवतंय, २९ नोव्हेंबर २००५ हा माझा वाढदिवस होता. कोलकात्यामध्ये निवडणुका होत्या, जे जगमोहन दालमिया यांचे होम ग्राउंड होते. मी अनेक न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई लढत होतो आणि हरीश साळवे माझ्या बाजूने उभे होते. निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली पार पाडल्या जाव्यात, असा आदेश मिळवण्यात आम्हाला यश आले. कोणालाही त्या न्यायाधीशांची नावे माहीत नव्हती. आम्हाला ‘एकतर्फी आदेश’ मिळाला होता. बैठक सुरू झाली तेव्हा असे काही घडणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. दालमिया टेबलवर बसले होते आणि ते आमच्यातील बऱ्याच जणांना अपात्र ठरवणार होते. पण सर्व काही वेळेवर अवलंबून असते. अगदी योग्य वेळी मी तिथे पोहोचलो आणि सर्वोच्च न्यायालयाचा तो आदेश सादर केला.”

दालमियांना मागे हटावे लागले
मोदी पुढे म्हणाले की, “मी त्यांना सांगितले की, तुम्ही या समितीचे अध्यक्ष राहू शकत नाही. त्यानंतर मोठा गदारोळ झाला. दरवाजे बंद करण्यात आले. पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागला. सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश तिथे दाखल झाले. दालमियांना मागे हटावे लागले. आता आम्ही निवडणुका घेणार होतो. अरुण जेटली आणि इतर सर्व वकील हतबल झाले होते, ते ही प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी पुन्हा न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना बैठक पुढे ढकलायची होती. जी बैठक अर्ध्या तासात संपायला हवी होती, ती संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली. तिथे मोठा तमाशा झाला.”
हॉटेलच्या खोल्यांमध्ये अडवलं, विमाने डायव्हर्ट केली
२००५ मधील बीसीसीआयच्या या चुरशीच्या निवडणुकीत मतांसाठी पडद्यामागे अनेक गोष्टी सुरु होत्या असे मोदींनी सांगितले. बैठकीपूर्वी मतांचे गणित बदलण्यासाठी बोर्डाच्या अनेक सदस्यांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये डांबून ठेवण्यात आले होते, तर प्रतिनिधींना घेऊन जाणाऱ्या विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते, असे मोदी म्हणाले. ”हे सर्व घडण्यापूर्वी, भारताच्या कानाकोपऱ्यातून बीसीसीआयचे सदस्य या बैठकीसाठी येत होते. काही लोकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये अडवून ठेवले होते, तर काहींची विमाने डायव्हर्ट केली जात होती. मला हे मान्य करावे लागेल की, आम्हीसुद्धा त्यांच्या काही सदस्यांच्या विमानांचे मार्ग बदलून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते. ती एक निवडणूक होती आणि ती कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच होती. पण निकाल स्पष्ट होता, आम्ही गुणवत्तेच्या जोरावर जिंकणार होतो,” असे मोदींनी नमूद केले.
अखेर पवारांचा विजय
“शेवटी आम्ही जिंकलो. खरं तर राजीव शुक्ला, अनुराग ठाकूर, अरुण जेटली, एन. श्रीनिवासन या सर्वांनी दालमिया यांना मतदान केले होते, तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ते कधीच पवारांच्या छावणीत नव्हते. मी मुद्दामून या लोकांची नावे घेत आहे. ते दुसऱ्या बाजूला होते आणि तेच पैशांचा खेळ करत होते. रुंगटा यांच्यासोबत ते दालमियांचा कोअर ग्रुप होते, ज्यांना नंतर बाहेर काढण्यात आले. दुसरीकडे आमचा गट होता, जो स्वच्छ आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवणारा होता. आम्ही बीसीसीआयच्या प्रत्येक सदस्याला पटवून दिले की आम्ही त्यांच्या फायद्याचे आहोत. अशा प्रकारे आम्ही ती निवडणूक जिंकली आणि २९ नोव्हेंबर रोजी आमची सत्ता आली. आणि तिथूनच आजच्या आधुनिक क्रिकेटमधील क्रांतीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,” असे ललित मोदींनी सांगितले.
