बिहार विधानसभेच्या अध्यक्षांनी एका कट्टर नक्षलवाद्याला आपला सहकारी म्हणून जपानच्या दौऱ्यावर सरकारी खर्चाने नेले होते, असा जळजळीत आरोप राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी येथे केल्याने खळबळ माजली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी कट्टर नक्षलवादी मुरारी यादव याला सरकारी खर्चाने जपानला नेले, इतकेच नव्हे तर चौधरी हे राजदचे गयातील खासदार राजेशकुमार यांच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा आरोपही लालूप्रसाद यांनी केला. राजेशकुमार यांच्या नातेवाइकांना त्याबाबतची सर्व कागदपत्रे आणण्यास आपण सांगितले असल्याचेही लालूप्रसाद म्हणाले.राजदमधून फुटलेल्या १३ आमदारांना विधानसभेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याच्या चौधरी यांच्या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव संतप्त झाले असून त्यांनी चौधरी यांच्यावर चौफेर टीका केली आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या अध्यादेशात राजदचे १३ माजी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे. पक्षाने या आमदारांची हकालपट्टी केलेली नाही अथवा या आमदारांनी स्वत:हून राजीनामे दिलेले नाहीत. असे असताना या आमदारांचा उल्लेख माजी असा कसा केला जातो, असा सवालही लालूप्रसाद यांनी केला.