पीटीआय, नवी दिल्ली : जमिनीच्या मोबदल्यात नोकरीच्या कथित घोटाळय़ातील एका प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते व माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, त्यांची कन्या मिसा भारती आणि अन्य एकास बुधवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने जामीन मंजूर केला.
७४ वर्षीय लालूप्रसाद यादव यांच्यावर नुकतीच मूत्रिपडरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते न्यायालय परिसरात चाकाच्या खुर्चीत उपस्थित होते. लालूप्रसाद सकाळी दहाच्या सुमार ‘राऊज अॅव्हेन्यू’ न्यायालयात पोहोचले. मात्र सुनावणी सुरू होण्यास थोडा विलंब झाला. सकाळी अकराला लालूप्रसाद, राबडीदेवी व मिसा भारती न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या न्यायालयात हजर राहिले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलका व तितक्याच जामीन रकमेवर जामीन मंजूर केला. या प्रकरणी पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे. या जामीन याचिकेस केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विरोध केला नाही. लालूप्रसाद हे २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेमंत्रीपदी असतानाचे हे कथित घोटाळा प्रकरण आहे. या काळात लालू यांच्या कुटुंबीयांना भेटीदाखल देण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात संबंधितांची रेल्वे विभागात नियुक्ती केल्याचा आरोप आहे.