Rohini Acharya: बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला मोठ्या प्रमाणात यश मिळालं, तर विरोधकांना पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार येताच नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का दिला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला आता पाटण्यातील १० सर्क्युलर रोड येथील सरकारी निवासस्थान रिकामं करावं लागणार आहे. त्यांच्या याच घरी संपूर्ण यादव कुटुंब राहतं.
बिहार सरकारच्या बांधकाम विभागाने लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला हे निवासस्थान रिकामं करण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या २० वर्षांपासून यादव कुटुंब या ठिकाणी राहत होतं. मात्र, आता लालू प्रसाद यादव यांना हे निवासस्थान रिकामं करावं लागणार आहे. बांधकाम विभागाने त्यांना दुसरं एक नवीन निवासस्थान देखील सुचवलं आहे. दरम्यान, या घडामोडीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य ह्या बिहार सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
रोहिणी आचार्य यांनी काय म्हटलं?
“सुशासन बाबूंचं विकास मॉडेल. लाखो लोकांचे मसीहा लालू प्रसाद यादव यांचा अपमान करणं ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे. ते लालू प्रसाद यादव यांना घराबाहेर काढतील, पण बिहारच्या लोकांच्या हृदयातून कसं काढतील? लालू प्रसाद यादव यांचं आरोग्य नाही तर किमान त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा तरी आदर करायला हवा होता”, असं रोहिणी आचार्य यांनी त्यांच्या एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.
२० वर्षांनंतर राबडी देवींना त्यांचं निवासस्थान रिकामं करावं लागणार
गेल्या २० वर्षांपासून राबडी देवी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब १० सर्क्युलर रोड येथे राहत आहेत. आता त्यांचं नवीन निवासस्थान ३९ हार्डिंग रोड या ठिकाणी असेल. यादव कुटुंब २००६ पासून याच १० सर्क्युलर रोड येथील निवासस्थानी राहत होतं. पण आता हे निवासस्थान रिकामं करण्यास सांगितल्यामुळे रोहिणी आचार्य ह्या नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारवर भडकल्या आहेत.
रोहिणी आचार्य यांनी काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादवांवरही टीका केली होती
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांचं घर फुटलं आहे. लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची घरातून आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली होती. रोहिणी आचार्य यांनी म्हटलं होतं की, वडिलांना किडणी देण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला. एक बाटली रक्त दिल्यानंतर ज्याचं रक्त सुकून जातं तो किडणी देणाऱ्या मुलीला उपदेश देतो आहे? वडिलांना किडणी देणाऱ्या मुलीला तुझं लग्न झालंय निघून जा हे सांगितलं जातं, यावर काय बोलणार? मुलींना किती काळ माहेरी राहिलं पाहिजे हे कोण ठरवणार? मी माझ्या माहेरी घालवलेल्या वेळेचा हिशेब मांडला जाणार का? असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं होतं.
