राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे आणि बिहारमधील कॉंग्रेसचे नेते साधू यादव यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपली ही सदिच्छा भेट असल्याचे साधू यादव यांनी म्हटले असले, तरी त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
गांधीनगरमधील माझ्या एका मित्राच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी मी आलो होता. त्यामुळेच मोदी यांची भेट घेतली, असे यादव यांनी सांगितले. सुमारे ४० ते ४५ मिनिटांच्या भेटीमध्ये मोदी यांनी बिहारमधील जुन्या राजकारण्यांबद्दल तसेच राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल चर्चा केली. त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्याविषयीही चौकशी केल्याचे यादव म्हणाले. आपली ही पूर्णपणे सदिच्छा भेट होती आणि कोणीही त्याचा राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. यादव यांच्यासोबत बिहार कॉंग्रेसचे नेते दसाई चौधरी हेदेखील यावेळी उपस्थित होते.