लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यात तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी पाटणा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तेज प्रताप राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र आहेत. यावर्षी १२ मे २०१८ रोजी तेज प्रताप यादव यांचे ऐश्वर्या रायबरोबर लग्न झाले होते. त्यांनी पाटणा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

ऐश्वर्या राय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असताना अचानक हे घटस्फोटाचे वृत्त आले आहे. ऐश्वर्या सुद्धा राजकीय कुटुंबातून असून २०१९ लोकसभा निवडणुकीत ऐश्वर्याला सारण लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाईल अशी चर्चा होती. ऐश्वर्या राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आणि बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी आहे. चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांचे सुपूत्र आहेत. दरोगा बिहारचे १० वे मुख्यमंत्री होते. १६ फेब्रुवारी १९७० ते २२ डिसेंबर १९७० पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

घटस्फोटासाठी अर्ज दाखल करुन तेज प्रताप रांची येथील रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी निघून गेले. पाटणा येथील मोठया मैदानात तेज प्रताप-ऐश्वर्याचा हायप्रोफाईल विवाहसोहळा मे महिन्यात पार पडला होता. जवळपास १० हजार लोक या लग्नाला आले होते. लग्नानंतर तेज प्रतापचे लहान भावाबरोबर पटत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरजेडी आणि जेडीयूचे सरकार असताना तेज प्रताप बिहारचे आरोग्यमंत्री होते. आरजेडीचे काही नेते आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना वरुन आदेश आहेत असा त्यांनी आरोप केला होता.