लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड हे धारवाड जिल्ह्यातील कुंदगोल तालुक्यातील बेटादूर गावातील शेतकरी कुटुंबातले होते. मुख्यत: शेतीवर आधारित या गावाने आजवर सैन्यदलाला सहा पुत्र दिले आहेत.
एकत्र कुटुंबपद्धतीत हणमंतप्पा राहत होते. त्यांची एकूण ३ एकरांची वडिलोपार्जित जमीन आहे. काही वर्षांपूर्वीच हणमंतप्पा यांच्या वडिलांचे निधन झाले.
दररोज ६ किलोमीटरचा प्रवास करुन ते शाळेत जात. कुटुंबातील सगळ्यात धाकटे असलेले हणमंतप्पा यांना नेहमीच सैन्यात भरती व्हायचे होते. यासाठी त्यांनी लहानपणापासूनच मेहनत घेण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यांचे पहिले तीन प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर त्यांची १४ वर्षांपूर्वी १९ मद्रास रेजिमेंटमध्ये निवड झाली. चार वर्षांपूर्वी लान्स नाईक कोप्पड यांचे महादेवी (जयश्री) यांच्याशी लग्न झाले. त्यांना दोन वर्षांची नेत्रा नावाची एक लहान मुलगी आहे. त्यांनी सहा महिन्यांनपूर्वी आपल्या बेटादूर या गावाला भेट दिली होती. हिमस्कलनाची घटना घडण्यापुर्वी एक दिवस आधी त्यांनी घरी फोन द्वारे संपर्क साधून घरच्यांची चौकशी केली अशी माहिती हणमंतप्पा यांचे मोठे बंधु गोविंदप्पा यांनी दिली.



