कर्नाटकमधील एका ‘रोड शो’दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याची घटना समोर आली आहे. मागील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी भाजपाने दावणगेरे येथे ‘रोड शो’चं आयोजन केलं होतं. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त सज्ज होता.
दरम्यान, एका तरुणाने पंतप्रधान मोदींच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धात पोलीस आणि सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली. त्यांनी संबंधित तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिशेनं धावत असताना ताब्यात घेतलं. आरोपी तरुणाची चौकशी सुरू आहे. त्याची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.
हेही वाचा-“…तर बाळासाहेबांनी अमित शाहांना ‘मिस्टर इंडिया’ म्हटलं असतं”, एकनाथ शिंदे यांचं विधान
ही संपूर्ण घटना दावणगेरे येथील आहे. येथे पंतप्रधान मोदींचा रोड शो काढण्यात आला होता. हा ‘रोड शो’ पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती. जोरात घोषणाबाजी सुरू होती. दरम्यान, एका तरुणाने धावत पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हा तरुण मोदींच्या गाडीपासून काही अंतर दूर असतानाच सुरक्षा व्यवस्थांनी त्याला ताब्यात घेतलं.
खरं तर, घटनास्थळी पंतप्रधानांच्या रोड शोसाठी तीन ते चार थरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले होते. येथे उपस्थित लोकांना बॅरिकेडवरून उडी मारून रस्त्यावर येऊ नका, असे आधीच सांगण्यात आलं होतं. असं असतानाही आरोपी तरुणाने बॅरिकेड्सवरून उडी मारली आणि मोदींच्या दिशेने धाव घेतली. पण सुरक्षा व्यवस्थांनी तरुणाला पकडलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.