Lashkar e Taiba Threatens Pakistan PM Army Chief: लष्कर-ए-तोयबाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना उघड धमकीवजा इशारा दिला आहे. “इस्रायलशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करु नये”, असा इशारा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरी याने पाकिस्तानी नेतृत्वाला दिला आहे. यावरुन आता पाकिस्तानमध्ये वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांचा इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी असलेला ‘अब्राहम अकॉर्ड्स’ प्रस्ताव पाकिस्तानने फेटाळून लावला. यानंतर कसुरीचा व्हिडीओ समोर आला आहे.

सैफुल्ला कसुरीचा मुनीर-शाहबाज शरीफांना इशारा

पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करारात मध्यस्थी करत आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे. अशात इस्रायला पाठिंबा देण्यावरुन लष्कर-ए-तोयबाने पाकिस्तानी नेतृत्वाला उघड-उघड धमकी दिली आहे. तोयबा उपप्रमुख सैफुल्लाचा याबाबतच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कसुरीने आसिम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांना धमकीवजा इशारा दिला आहे. “कोणताही पाकिस्तान नेता इस्रायलबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल त्याची हत्या केली जाईल, त्याला संपवले जाईल आणि उद्ध्वस्त केले जाईल”, असा धमकी देतानाचा कसुरीचा व्हिडीओ समोर आला आहे.

कसुरीचा व्हिडीओ व्हायरल

कसुरीच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांचा वाढत्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कट्टरवादी संघटना देशाच्या राजकीय आणि लष्करी वरिष्ठांवर दबाव निर्माण करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. कट्टरवादी दहशतवादी संघटनांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आता या संघटना उघडपणे धमकी देत आहेत, याबाबतही या विषयातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘अब्राहम अकॉर्ड्स’चा प्रस्ताव धुडकावला

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर शांतता करार करण्यासाठी पाकिस्तानला ‘अब्राहम अकॉर्ड्स’मध्ये सामील होण्याची विनंती केली होती. पण, पाकिस्तानने अमेरिकेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इस्रायलबरोबर राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी असलेला हा करार पाकिस्तानच्या मूळ विचारसरणीच्या आणि धोरणांच्या पूर्णपणे विरोधात आहे, अशी स्पष्ट भूमिका पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी घेतली आहे.