पीटीआय, श्रीनगर

मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारच्या चकमकीत ठार झालेला ‘लष्कर-ए-तैयबा’चा प्रमुख दहशतवादी हा पाकिस्तान लष्कराच्या ‘स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप’ (एसएसजी) या विशेष तुकडीतील निवृत्त हवालदार होता. तसेच त्याने एकेकाळी माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या सुरक्षा ताफ्यातही सेवा बजावली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

मंगळवारी रात्री उशिरा युसमार्ग येथील कोराग परिसरातील उंच डोंगराळ भागात लष्कर आणि इतर सुरक्षा दलांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मुसा याला ठार करण्यात आले. मुसा हा अनेक महत्त्वाच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. विशेषतः गेल्या तीन वर्षांत लष्करी जवान आणि नागरी वस्त्यांना लक्ष्य करून केलेल्या घातपाती हल्ल्यांचे आणि आघातांचे प्रमाण वाढले होते, त्यामध्ये मुसाचा सहभाग होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘फौजी’ आणि ‘सुलेमान शाह’ अशा टोपणनावांनीही वावरणाऱ्या आसिफने २०२१ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. तो या भागात ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य ‘ऑपरेशन्स कमांडर’ म्हणून कार्यरत होता. एप्रिल २०२५ मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यातही मुसाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या मृत्यूमुळे पाच वर्षे चाललेल्या सखोल शोधमोहिमेचाच शेवट झाला असून, पाकिस्तानस्थित या दहशतवादी संघटनेचे या भागातील नेतृत्वही संपुष्टात आल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘एसएसजी’मध्ये १८ वर्षे सेवा

पाकिस्तानी लष्करातील आपल्या २३ वर्षांच्या कार्यकाळात आसिफने १८ वर्षे ‘एसएसजी’मध्ये सेवा बजावली. २००६ ते २००८ या काळात त्याला पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या सुरक्षा ताफ्यात नियुक्त करण्यात आले होते. सेवेदरम्यान, त्याने अमेरिकेत ‘व्हीव्हीआयपी’ संरक्षणाचे विशेष प्रशिक्षण घेतले आणि अमेरिकन ‘स्पेशल फोर्सेस’बरोबर वैद्यकीय अभ्यासक्रमही पूर्ण केले.