पीटीआय, नवी दिल्ली

लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी रझाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबु साइउल्ला हा पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये रविवारी मारला गेल्याचे दिल्लीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. खालिद हा २००६मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता. त्याला तीन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घातल्याची माहिती आहे.

खालिद भारतामधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. २००५मध्ये बंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’वरील (आयआयएस) हल्ला आणि २००१मधील रामपूर सीआरपीएफच्या छावणीवरील हल्ल्यातही त्याचा हात होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खालिदने विनोद कुमार, मोहम्मद सलीम आणि रझाउल्ला अशी वेगवेगळी टोपणनावे घेतली होती. त्याला पाकिस्तान सरकारने सुरक्षा प्रदान केली होती. रविवारी दुपारी सिंधच्या माटली येथील घरातून बाहेर पडला असता बंदूकधाऱ्यांनी खालिदवर गोळ्या झाडल्या. तो लष्कर-ए-तय्यबाच्या अबु अनासचा जवळचा साथीदार होता. त्याने संघाच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्या हल्ल्यातील सर्व तिन्ही दहशतवादी मारले गेले होते. तर २००६मध्ये आयआयएसवरील हल्ल्यात आयआयटीचे प्राध्यापक मुनिश चंद्र पुरी यांचा मृत्यू झाला होता आणि चौघेजण जखमी झाले होते. त्या हल्ल्यातील दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्या प्रकरणात अबु अनासविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून तो अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.