भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’या दहशतवादी संघटनेला सर्वाधिक फटका बसला आहे. सर्जिकल स्ट्राईक कारवाईसंदर्भात पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्यामध्ये झालेले रेडिओ संभाषण गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले. या संभाषणातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबा’च्या २० दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्तान घातल्याची माहिती समोर आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करेल, असे दहशतवाद्यांना अपेक्षित नव्हते. त्यामुळे भारतीय लष्कराने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची तारांबळ उडाली. भारतीय जवानांनी मारण्यास सुरुवात केल्यानंतर या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्करी चौकीच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी आपले काम फत्ते केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. ही कारवाई करुन भारतीय सैन्य सुखरुप परतल्यानंतर या दहशतवाद्यांच्या मृतदेहांचा पाकिस्तानी लष्कराने विल्हेवाट लावली. पाकिस्तानमधील नीलम खोऱ्यामध्ये या दहशतवाद्यांना दफन करण्यात आल्याची माहिती संभाषणातून समोर आली. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानचे आठ जवान देखील ठार झाल्याचे स्पष्ट होते.
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवरुन सध्या अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने भारताने सर्जिकल स्ट्राईक केले नाही, असे म्हटले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेल्या चोखप्रत्तुतरानंतर लष्कर आणि मोदी सरकारवर कौतुकांचा वर्षाव झाला. गेल्या काही दिवसात विरोधी पक्षनेत्यांनी सरकारकडे सर्जिकल स्ट्राईक संदर्भात पुरावे मागून या कारवाईवर शंका उपस्थित केली होती. गुप्तचर यंत्रणेच्या या रेडिओ संभाषणातून भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची सत्यता समोर येईल.