एम एस स्वामिनाथन यांना आज अखेरचा निरोप

भारतातील ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

MS swaminathan funeral procession
एम एस स्वामिनाथन यांना आज अखेरचा निरोप

पीटीआय, चेन्नई : भारतातील ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांना देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. स्वामिनाथन यांचे गुरुवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुली आहेत. त्यांची कन्या डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.

स्वामिनाथन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नई येथील एम एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) या संस्थेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व थरांतील लोकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी गर्दी केली. त्यांच्या पार्थिवावर आज, ३० सप्टेंबरला संपूर्ण पोलीस इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भारतात १९६० च्या दशकात भुकेची समस्या आ वासून उभी असताना आधुनिक पद्धतीच्या शेतीचा प्रसार करून स्वामिनाथन यांनी देशात हरित क्रांती घडवून आणली. त्यानंतर एकेकाळी अन्नधान्यासाठी परदेशी मदतीवर अवलंबून राहणारा देश ही अशी ओळख पुसून ‘जगाचे धान्याचे कोठार’ अशी नवी ओळख भारताने मिळवली. स्वामिनाथन यांच्या निधनामुळे कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार यांचे युग संपुष्टात आले असल्याची प्रतिक्रिया भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक ए के सिंह यांनी व्यक्त केली.

देशातील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांसाठी तांदळाच्या विविध प्रकारच्या उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती तयार करण्यात स्वामिनाथन यांनी मोलाची भूमिका बजावली. प्रशासनात असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला होता. त्यांनी २००४ साली राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

शेतकऱ्यांना दुप्पट हमीभावाची शिफारस

वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हा आयोग स्वामिनाथन आयोग म्हणूनही ओळखला जातो. त्यांनी २००६ साली केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालात, शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी मिळणारा हमीभाव हा मालाच्या उत्पादनाच्या खर्चाच्या किमान दुप्पट असावा अशी महत्त्वाची शिफारस करण्यात आली होती.

अल्प परिचय

  • ७ ऑगस्ट १९२५ – तमिळनाडूतील कुंभकोणम येथे जन्म
  • १९४९ – अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, वेजिनगन येथे बटाटय़ावर संशोधनाद्वारे कारकीर्दीला सुरुवात
  • १९५२ – केंब्रिज विद्यापीठात जेनेटिक्स विषयात पीएचडी
  • केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था, कटक येथे नियुक्ती
  • १९६१-७२ – भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक
  • १९६७ – पद्मश्री पुरस्कार
  • १९७१ – रामन मॅगसेसे पुरस्कार
  • १९७२ – पद्मभूषण पुरस्कार
  • १९७२-७९ – भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महासंचालक आणि भारत सरकारचे सचिव
  • १९८७ – उच्च उत्पादन देणाऱ्या गहू आणि तांदळाच्या विकासासाठी जागतिक अन्न पुरस्कार
  • १९८९ – पद्मविभूषण पुरस्कार
  • जगभरातून ८४ मानद डॉक्टरेटने सन्मानित
  • रॉयल सोसायटी ऑफ लंडन आणि यूएस नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस यासह अनेक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे फेलो
  • २००७-१३ – राज्यसभा सदस्य

एम एस स्वामिनाथन समृद्ध वारसा आपल्यामागे ठेवून गेले आहेत. मानवजातीला एका सुरक्षित आणि भूकमुक्त जगाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक दीप म्हणून हा वारसा काम करेल. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

स्वामिनाथन यांच्या नावीन्यपूर्ण कामामुळे भारतीयांना अन्न सुरक्षा मिळाली आणि लाखो लोकांचे जीवन बदलले. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

स्वामिनाथन यांच्या भारताच्या कृषीव्यवस्थेत क्रांती घडवण्याच्या दृढ वचनबद्धतेने भारताचे रूपांतर गरजेपेक्षा जास्त धान्याचा साठा असलेल्या देशात झाले आहे. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस</strong>

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Last farewell to ms swaminathan today father of green revolution in india ysh

First published on: 30-09-2023 at 04:01 IST
Next Story
एकत्रित निवडणुकांसाठी सूत्र तयार करण्याचा विधि आयोगाचा प्रयत्न; विधानसभांचा कार्यकाळ घटवण्या-वाढवण्याचा पर्याय