तुम्ही देवावरही विनोद करू शकता, पण हा विनोद आक्षेपार्ह नसला पाहीजे, असे एखादा कलाकार नाही तर खुद्द ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस सांगत आहेत. शुक्रवारी व्हॅटिकन शहरात पोप फ्रान्सिस यांनी अमेरिका आणि युरोपमधील प्रख्यात १०० कलाकारांशी संवाद साधला. यामध्ये विनोदी कलाकार, अभिनेते आणि लेखकांचा समावेश होता. अमेरिकेतील नामवंत कलाकार हूपी गोल्डबर्ग, जिमी फॅलन, कॉनन ओब्रायन, ख्रिस रॉक आणि स्टीफन कोल्बर्ट यांचाही या बैठकीत समावेश होता. तर निम्म्याहून अधिक इटालियन कलाकार यावेळी उपस्थितीत होते.

या बैठकीत विनोदी कलाकारांनी विचारलेल्या प्रश्नांना पोप फ्रान्सिस यांनी दिलखुलास उत्तरे दिली. आपण देवावर हसू शकतो का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, अर्थात आपण हसू शकतो. ही देवाची निंदा होत नाही. जसे आपण आपल्या जवळच्या लोकांबरोबर प्रेम आणि आनंद व्यक्त करतो, तसेच देवाचे आहे.

पोप फ्रान्सिस पुढे म्हणाले, चांगला विनोद हा लोकांना अपमानित करत नाही किंवा कुणामध्ये कमीपणाची भावना निर्माण करत नाही. ज्यू धर्माच्या साहित्यात तर चांगल्या विनोदाचे अनेक उदाहरणे दिली आहेत. पोप फ्रान्सिस यांनी काही काळापूर्वी समलिंगी लोकांबद्दल आक्षेप व्यक्त करणारे विधान केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट कलाकारांशी संवाद साधत असताना विनोदाच्या अभिव्यक्तीवर भाष्य केले.

“मी आता जे सांगतोय ते अर्थातच असत्य नाही. तुम्ही (कलाकार) जेव्हा असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही आपोआपच देवालाही हसवता”, असेही पोप फ्रान्सिस यावेळी म्हणाले. आपल्या संबोधनानंतर पोप फ्रान्सिस यांनी बैठकीत सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी कलाकारांसह हास्य विनोदही केला. अनेक कलाकारांनी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या होत्या. यात इटालियन मद्याचाही समावेश होता. काही कलाकारांनी त्यांच्यासह सेल्फीही घेतली.

इटलीमध्ये नुकतीच दोन दिवसीय जी७ देशांची शिखर परिषद संपन्न झाली. या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहिले होते. जागितक नेत्यांच्या भेटीगाठीसह मोदींनी पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली. यावेळी मोदींनी पोप फ्रान्सिस यांची गळाभेट करत त्यांच्याशी काही क्षण हास्यविनोदही केला. पोप फ्रान्सिस यांनी एकदा भारताला भेट द्यावी, असे निमंत्रण पंतप्रधान मोदींनी त्यांना दिले आहे. याची माहिती खुद्द त्यांनीच एक्स अकाऊंटवरून दिली.