पीटीआय, श्रीहरिकोटा
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पीएसएलव्ही) शनिवारी सिंगापूरच्या दोन उपग्रहांना नियोजित कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. ‘इस्रो’द्वारे ही माहिती देण्यात आली.‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’द्वारे सिंगापूरच्या या उपग्रहांच्या प्रक्षेपणाची जबाबदारी घेण्यात आली होती. २२.५ तासांच्या उलटगणतीनंतर ४४.४ मीटर उंचीच्या प्रक्षेपकाने येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून दुपारी दोन वाजून १९ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.




‘इस्रो’चे प्रमुख व अवकाश विभागाचे सचिव एस. सोमनाथ यांनी सांगितले, की या प्रक्षेपकाने दोन्ही उपग्रहांना त्यांच्या अपेक्षित कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. नियंत्रण कक्षातून बोलताना सोमनाथ यांनी अभिमानाने सांगितले, की ‘पीएसएलव्ही’ने आपल्या ५७ व्या मोहिमेत यश मिळवून पुन्हा एकदा विश्वासार्हता आणि व्यावसायिक मोहिमांसाठी क्षमता सिद्ध केली.मोहीम संचालक एस. आर. बिजू म्हणाले की, ही मोहीम अत्यंत अचूक पद्धतीने यशस्वी झाली.
वेळ, खर्चात बचत
‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले की, या मोहिमेतील ‘पीएसएलव्ही’ मध्ये अनेक वैशिष्टय़े आणि सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे प्रक्षेपकासाठीचा खर्च, तसेच त्याच्या जुळणीसाठीचा वेळ घटवला आहे. यामुळे आगामी काळात या वैशिष्टय़ांद्वारे ‘पीएसएलव्ही’ उत्पादनात आणि प्रक्षेपणात वाढ होण्यास मदत होईल.