Laura Loomer On Donald Trump : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापार कराराच्या मोठ्या चर्चा सुरू होत्या. अखेर काही दिवसांपूर्वी भारत-अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर दोन्ही देशांची अंतरिम सहमती झाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. त्यानंतर भारतावरील आयात शुल्क ५० टक्क्यांऐवजी १८ टक्के करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. मात्र, जोपर्यंत भारत-अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करारावर दोन्ही देशांची सहमती होत नव्हती, तोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्य करत असल्याचं दिसून आलं होतं.
तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करणं बंद करावं, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर भारत आणि पाकिस्तान संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचे हे सर्व दावे फेटाळून लावल्यानंतर ते सातत्याने भारताच्या विरोधी वक्तव्य करताना पाहायला मिळाले. मात्र, अमेरिका आणि भारत व्यापार करारावर सहमती होताच आता ट्रम्प यांचा सूर पुन्हा बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी लॉरा लूमर यांनी मोठं भाष्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक खास संदेश पाठवला असल्याचं लॉरा लूमर यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये बोलताना म्हटलं आहे. यावेळी लॉरा लूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खास संदेश वाचून दाखवला.
लॉरा लूमर यांनी म्हटलं की, मी आताच एका तासापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलले. तेव्हा ट्रम्प यांनी मला सांगितलं की माझा भारतासाठी संदेश आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी. मला भारतीय लोक आवडतात. पंतप्रधान मोदी एक उत्तम नेते आणि माझे चांगले मित्र आहेत. कृपया भारतातील लोकांना सांगा की मी लवकरच पुन्हा एकदा भारतात येईन’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं असल्याचं लॉरा लूमर यांनी सांगितलं आहे.
भारत आणि अमेरिकेत आणखी एक मोठा करार होणार; अमेरिकेच्या राजदूतांची घोषणा
भारत आणि अमेरिकेत आता आणखी एक मोठा व्यापार करार लवकरच होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी दिले आहेत. राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं की, भारत आणि अमेरिका एका मोठ्या खनिज व्यापार कराराची तयारी करत आहेत.
राजदूत सर्जियो गोर यांच्या खनिज कराराच्या संदर्भातील वक्तव्यामुळे भारत आणि अमेरिका लवकरच खनिजांबाबतच्या कराराची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश लवकरच एक महत्त्वपूर्ण खनिज व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याच्या जवळ असल्याचं सर्जिओ गोर यांनी म्हटलं आहे.
सर्जिओ गोर यांनी म्हटलं की, “आमच्या देशांमधील सहकार्याच्या सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे खनिजे. या खनिजांसाठी विश्वासार्ह पुरवठा साखळ्या, आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अपरिहार्य आहेत. त्यामुळे मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की अमेरिका आणि भारत आज एक महत्त्वपूर्ण खनिज करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ आहेत, जो प्रगत उत्पादन, ऊर्जा प्रणाली आणि तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा साखळ्या सुनिश्चित करण्यास मदत करेल. पुढच्या काही महिन्यांत या कराराची घोषणा होण्याची अपेक्षा आहे”, असं सर्जिओ गोर यांनी नुकतंच म्हटलं आहे.
