देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर देशभरातील शेतकरी कृषी कायद्यांचा वर्षभरापासून निषेध करत आहेत. काँग्रेसने सतत नवीन कृषी कायद्यांवरुन सरकारला घेरले आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीच्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालवत सर्वांना आश्चर्यचकित केले. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी ट्रॅक्टर चालवून संसद भवनात पोहोचले. रणदीप सुरजेवाला, बीव्ही श्रीनिवास आणि दीपेंद्र हूडा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते राहुल गांधींबरोबर ट्रॅक्टरवर दिसले. या दरम्यान सुरजेवाला आणि श्रीनिवास यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

“मी शेतकऱ्यांचा संदेश संसदेत आणला आहे. ते (सरकार) शेतकर्‍यांचे आवाज दाबत आहेत आणि संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. त्यांना हे काळे कायदे रद्द करावे लागतील. संपूर्ण देशाला हे माहित आहे की हे कायदे २-३ बड्या उद्योजकांसाठी आहेत” असे राहुल गांधी यांनी म्हटलं.

“सरकारच्या मते शेतकरी खूप आनंदात आहेत आणि बाहेर बसलेले (निषेध करणारे शेतकरी) अतिरेकी आहेत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे हक्क हिसकावले जात आहेत,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत जंतर-मंतर येथे किसान संसद सुरु आहे. २०० शेतकरी दररोज जंतर-मंतर येथे सहभागी होत आहेत. हे आंदोलन संसदेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार आहे.

गेल्या एका वर्षापासून शेतकऱ्यांचा कृषी कायद्याविरोधात निषेध दिल्लीच्या टिकरी, सिंघू आणि गाजीपूर सीमेवर सुरू आहे. हे तीनही कायदे मागे घ्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, पण हे कायदे परत मागे घेतले जाणार नाहीत असे सरकारचे म्हणणे आहे. काही बदल करावा लागला तर सरकार चर्चेसाठी तयार आहे असे सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.