वृत्तसंस्था, वॉशिंग्टन/दुबई/झुरिक : अमेरिका आणि इराणदरम्यान शुक्रवारी जीनिव्हामध्ये होणारी चर्चा लेबनॉनमधील इस्रायल-हेजबोला ताज्या संघर्षामुळे स्थगित झाली. या घडामोडींनंतर शुक्रवारी सायंकाळी लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र, शांतता करारासंदर्भातील बोलणी आता कधी होणार, याबाबत अमेरिका किंवा इराणकडून अधिकृत तपशील देण्यात आलेला नाही.
पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणदरम्यान निश्चित झालेल्या शांतता कराराच्या मसुद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील बोलणीसाठी दोन्ही देशांचे प्रतिनिधी स्वित्झर्लंडमधील जीनिव्ह येथे शुक्रवारी भेटणार होते. मात्र, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये ११ ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांत १८ जणांचा मृत्यू, तर ३३ जण जखमी झाले. यात इस्रायलचेही चार सैनिक ठार झाले. त्यानंतर अचानक इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींनी स्वित्झर्लंड दौरा रद्द केला.
शांतता करारासाठी इस्रायल-हेजबोला यांच्यातील संघर्ष थांबण्याची अट इराणने घातली होती. अमेरिका-इराण यांच्यात अंतिम कराराची चौकट जी मान्य झाली आहे, त्यातही या अटीचा स्पष्ट उल्लेख आहे. पाकिस्तान या साऱ्यामध्ये मुख्य मध्यस्थ देश असून, कराराच्या चौकटीचे पालन होईल, यासाठी हमीदार देशही आहे. इराणने कराराच्या चौकटीचे पालन करण्याची जबाबदारी अमेरिकेवर टाकली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या हल्ल्यानंतर शांतता कराराच्या चर्चेत खंड पडल्याचे चित्र होते. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर इस्रायल-हेजबोला यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले. अमेरिका आणि कतारचे प्रतिनिधी इराणच्या मदतीने हेजबोला-इस्रायल यांच्यातील कराराचा तपशील ठरवत असल्याचे ते म्हणाले.
अमेरिका आणि इराणदरम्यान शांतता कराराची चर्चा करण्याची जबाबदारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यावर टाकली आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या ६० दिवसांच्या कालावधीत कराराची अंमलबजावणी करणे हे त्यांचे मुख्य काम असेल. व्हान्स यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील आतापर्यंतची ही सर्वात मोठी भूमिका आहे.
व्हान्स यांचे इस्रायलला खडेबोल
वॉशिंग्टन : इराण-अमेरिका शांतता कराराची घोषणा झाल्यानंतर आपण त्याचा भाग नसल्याचे इस्रायलने जाहीर केले. त्यानंतर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी या करारावर टीका करणाऱ्या इस्रायली नेत्यांना यांनी उत्तर दिले. इस्रायलला जगात आता फारसे मित्र उरलेले नाहीत, इस्रायल आता एकटा पडला आहे आणि त्यांचे नेते अमेरिकेने दिलेला राजनैतिक आणि लष्करी सहाय्य मान्य करत नाहीत, असे त्यांनी इस्रायलच्या लक्षात आणून दिले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’शी बोलताना व्हान्स यांनी इस्रायलवर कठोर टीका केली. “माझा त्यांना प्रश्न आहे – तुमचा काय प्रस्ताव आहे? तुमची लोकसंख्या ९० लाख आहे. तुम्ही लोकांना मारून तुमच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी प्रत्येक समस्या सोडवू शकत नाही,” असे ते म्हणाले. संपूर्ण जगात केवळ ट्रम्प हे एकमेव राष्ट्रप्रमुख इस्रायलशी सहानुभूती बाळगून आहेत, अमेरिकेने दीर्घकाळ इस्रायलला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यासह इस्रायलच्या अन्य नेत्यांना सुनावले.
होर्मुझमधून जाणाऱ्या नौकांची नोंदणी?
इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नौकांना नोंदणी करण्यास सांगितले असून, त्यासाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आहे. सामुद्रधुनीतून वाहतूक सध्या ‘टोल’मुक्त असली, तरी भविष्यात नौकांकडून शुल्क आकारण्याचा इशारा इराणने यातून दिला आहे. ‘होर्मुझ’मधील वाहतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी ‘पर्शियन गल्फ स्ट्रेट ऑथॉरिटी’ची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाने जारी केलेल्या नोटिशीनुसार, हंगामी कराराच्या ६० दिवसांत ‘होर्मुझ’मधून कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, सामुद्रधुनीतून ज्या नौकांना जायचे आहे, त्यांनी ४८ तास आधी तशी विनंती करावी, असे सांगण्यात आले आहे.
खामेनींच्या अंत्यसंस्काराला शरीफ उपस्थित राहणार
इस्लामाबाद : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे. अमेरिका-इस्रायलने फेब्रुवारीमध्ये केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याबरोबर फोनवर बोलणे झाले असून, ३ किंवा ४ जुलै रोजी खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याविषयी पेझेश्कियान यांनी विचारल्याचे सांगितले. तसेच, पाकिस्तानच्या मध्यस्थीबाबत आभारही मानल्याचे ते म्हणाले.
पॅलेस्टाइनकडून भारताच्या मध्यस्थीची अपेक्षा
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराच्या चौकटीवर स्वाक्षरी झाल्याचे समर्थन पॅलेस्टाइनचे भारतातील राजदूत अब्दुल्लाह एम. अबू शॉवेश यांनी केले. तसेच, यात कुणाचाही पराभव झाला नसून, सर्वांचा विजय झाल्याचे म्हटले आहे. ‘‘ज्या वेळी शांतता प्रस्थापित होते, त्या वेळी सर्वांचा विजय झालेला असतो,’’ असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी इस्रायलवर टीका केली. सर्व काही युद्धाद्वारेच मिळते, यावर इस्रायलचा विश्वास असल्याचे ते म्हणाले. ‘‘शांतता सर्वांसाठीच महत्त्वाची असून, या प्रदेशामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारताची १.४ अब्ज लोकसंख्या, चांगली अर्थव्यवस्था पाहता भारतामध्ये निश्चितच ती क्षमता आहे. मोदी सरकारकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. भारताचा एखादा ठाम निर्णय या प्रदेशातील भविष्य बदलू शकतो,’’ असे ते म्हणाले.
