वृत्तसंस्था, दुबई: इस्रायलने आपल्या सैन्याला लेबनॉनमध्ये शिरण्याचे आदेश दिल्यानंतर सोमवारी इराण आणि अमेरिकेदरम्यानचा शस्त्रसंधी धोक्यात आला होता. मात्र, त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हालचाली करून इस्रायलला सैन्य न पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच लेबनॉनस्थित आणि इराणसमर्थित हेजबोला गटालाही मध्यस्थांच्या द्वारे इस्रायलवरील हल्ले थांबवण्यास सांगितले. आता दोन्ही बाजूंनी हल्ले होणार नाहीत, असे त्यांनी समाजमाध्यमांवरून जाहीर केले. त्यामुळे भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री उशिरापर्यंत शस्त्रसंधीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव निवळल्याचे चित्र होते.
त्यापूर्वी, इस्रायलने दिवसभरात दक्षिण बेरुतवर हल्ले वाढवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनवरील हे हल्ले थांबवले नाहीत, तर इराण आणि अमेरिकेदरम्यानचा शस्त्रसंधी करार लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे, असे वृत्त इराणच्या सरकारी वाहिनीने दिले. त्याचवेळी, या हल्ल्यांसाठी इस्रायल अमेरिकेच्या संमतीची प्रतीक्षा करत होता, अशी माहिती किमान दोन इस्रायली सूत्रांनी दिली.
दुसरीकडे, आपल्याला इराणने दिलेल्या इशाऱ्याबद्दल कल्पना नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एनबीसी वाहिनीला सांगितले.
यापूर्वी, इराणची सरकारी वृत्तसंस्था ‘तस्नीम’ने वृत्त दिले होते की, इस्रायलने आपल्या सैन्याला लेबनॉनमध्ये अधिक आतमध्ये घुसण्याचे आदेश दिल्यानंतर इराणने अमेरिकेबरोबरची अप्रत्यक्ष चर्चा थांबवली आहे. यामुळे तीन महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या राजनैतिक प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात होते. मात्र, त्यानंतर पुन्हा हालचालींना वेग आला आणि इस्रायल व हेजबोलाने हल्ले थांबवण्याचे मान्य केल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले.
इस्रायलचे सैन्य बेरुतला जाणार नाही आणि जे सैन्य निघाले होते ते माघारी फिरले आहे. हेजबोलाने सर्व हल्ले थांबवण्याचे मान्य केले आहे. इस्रायल त्यांच्यावर हल्ले करणार नाही.
- डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
