बेरुत : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर, हा युद्धविराम हेजबोलासाठी लागू होत नाही असा दावा इस्रायलने केला. तसेच, शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर काहीच तासांनी लेबनॉनमधील दाट वस्तींवर जोरदार हवाई हल्ले केले.

शस्त्रसंधी जाहीर झाल्यामुळे लेबनॉनच्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. इस्रायलने बुधवारी दुपारी कोणतीही पूर्वसूचना न देता, मध्य बेरुतमधील वर्दळ असलेल्या अनेक व्यावसायिक आणि निवासी भागांमध्ये हवाई हल्ले केले. या लेबनॉनवरील सर्वात मोठ्या हल्ल्यात किमान ११२ जण ठार झाले आणि अन्य शेकडो जखमी झाले. त्याशिवाय इस्रायलने लेबनॉनच्या अन्य भागांमध्येही हल्ले केले. दिवसभरात संपूर्ण देशात २५४ जण ठार झाल्याची माहिती लेबनॉनच्या नागरी संरक्षण विभागाने दिली. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे विस्थापित झालेल्या लोकांनी जिथे आश्रय घेतला आहे, त्याच भागाला इस्रायलने लक्ष्य केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.

इराणमधील युरेनियम खणून काढणार – ट्रम्प

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने मागील वर्षी जूनमध्ये इराणवर हल्ले करून जे समृद्ध युरेनियम इराणमध्ये गाडले होते, ते बाहेर काढण्यासाठी आम्ही इराणबरोबर काम करू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असिफ मुनिर यांनी इराणवर विनाशकारी शक्तीचा वापर करू नये, म्हणून विनंती केली. तसेच, इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याचे मान्य केले. त्यामुळे इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करीत आहे. आमचे लष्करी उद्दिष्ट आम्ही साध्य केले आहे. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

इराणच्या वतीने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असिफ मुनिर यांनी युद्ध थांबविण्यासाठी घेतलेल्या अथक प्रयत्नांसाठी आभार. पंतप्रधान शरीफ यांच्या विनंतीनुसार, अमेरिकेचा १५ मुद्द्यांच्या आधारे अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणच्या १० मुद्द्यांच्या प्रस्तावावर वाटाघाटी करणे शक्य असल्याची घोषणा केली. – सईद अब्बास अराघची, परराष्ट्रमंत्री, इराण

ठळक घटनाक्रम

२८ फेब्रुवारी : अमेरिका आणि इस्रायलचा इरकाणवर हल्ला, हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी ठार. दक्षिण इराणमधील मिनाब प्रांतात एका मुलींच्या शाळेवर हल्ल्यात किमान १७५ जण ठार, मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थिनींचा समावेश. प्रत्युत्तरादाखल इराणचे इस्रायल आणि पश्चिम आशियातील कतार, कुवेत आणि ‘यूएई’मधील अमेरिकी तळांवर हल्ले.

१ मार्च : इराणी ड्रोनच्या हल्ल्यात कुवेतमध्ये अमेरिकेचे सहा सैनिक ठार. इराण-समर्थित हेजबोलाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले.

८ मार्च : इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून अयातोल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती. ही नियुक्ती अस्वीकार्य असल्याचे ट्रम्प यांच्याकडून जाहीर.

११ मार्च : होर्मुझच्या सामुद्रधुनीत आणि आजूबाजूच्या भागात इराणचे हल्ले अधिक तीव्र,

१२ मार्च : मोजतबा खामेनी यांनी देशाचे सर्वोच्च नेते म्हणून निवेदन प्रसिद्ध करून होर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवणे सुरू ठेवण्याचे लष्कराला निर्देश दिले. अमेरिकेचे केसी-१३५ लष्करी इंधन भरणारे विमान इराकमध्ये कोसळून सहा अमेरिकी सैनिकांचा मृत्यू.

१३ मार्च : इराणचे सर्वात मोठे तेलनिर्यातीचे केंद्र असलेल्या खार्ग बेटावर अमेरिकेचे बॉम्बहल्ले. मात्र, तेल प्रकल्पांना लक्ष्य न करता केवळ लष्करी सुविधांवर हल्ले केल्याचा ट्रम्प यांचा दावा.

१७ मार्च : इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारिजानी आणि ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’शी संलग्न असलेल्या बसिज गटाचे प्रमुख गोलामरझा सोलेमनी यांची इस्रायलच्या लष्कराने हत्या केली.

१८ मार्च : इराण आणि अमेरिकेच्या मित्र देशांचे आखाती देशांमधील महत्त्वाच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले. इस्रायलचा इराणचे ७० ते ७५ टक्के नैसर्गिक वायू उत्पादन करणार्‍या साउथ पार्स वायूक्षेत्रावर हल्ला. इराणने ‘रास लाफन इंडस्ट्रियल सिटी’ या जगातील सर्वात मोठ्या ‘एलएनजी’ निर्यात प्रकल्पावर वर हल्ला केल्याची कतारची माहिती.

२३ मार्च : युद्धसमाप्तीसाठी इराणबरोबर चर्चा सुरू झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची घोषणा.

२७ मार्च : इराणच्या हल्ल्यात सौदी अरेबियाच्या प्रिन्स सुल्तना हवाई तळावर अमेरिकेचे १२ सैनिक जखमी. 

२८ मार्च : येमेनमधील इराण-समर्थित हुथींनी सोडलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलने निकामी केले.

३ एप्रिल : इराणने अमेरिकेच्या हवाई दलाचे ‘एफ-१५ई’ हे लढाऊ विमान पाडले. दोन वैमानिकांपैकी एक बचावला. दोन दिवसानंतर दुसर्‍याची सुटका.

६ एप्रिल : होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासंबंधी करार न केल्यास इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची ट्रम्प यांची धमकी ७ एप्रिल : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी जाहीर केला. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दुजोरा दिला. दोन्ही बाजूंनी आपला विजय झाल्याचे जाहीर केले.