Lenskart Grooming Guidelines Controversy: लेन्सकार्टच्या कर्मचाऱ्यांसाठी कथित युनिफॉर्म आणि ग्रूमिंगची गाईडलाईन समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. नव्या नियमावलीनुसार, कर्मचाऱ्यांना बिंदी किंवा टिळा लावण्याची परवानगी दिली जाणार नाही तर, हिजाब आणि पगडी परिधान करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लेन्सकार्टवर धार्मिक भेदाभेद केल्याप्रकरणी टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, लेन्सकार्टचे संस्थापक, पियुष बन्सल यांनी याप्रकरणी आता स्पष्टीकरण देत ‘भाषा दोष’असल्याचे सांगितले.

काय आहे वादग्रस्त नियमावली?

लेन्सकार्टच्या युनिफॉर्म आणि ग्रूमिंगची गाईडलाईनमध्ये धार्मिक बिंदी किंवा टिळा लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण, काळ्या रंगाचा हिजाब आणि पगडी परिधान करु दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशाच प्रकारची एक नियमावली ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये महिलांना सिंदूर लावण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बन्सल यांनी कंपनीने ग्रूमिंग नियमावली अपडेट करण्यात आल्याचे सांगत समाज माध्यमांवर व्हायरल होणारी परिपत्रक जुने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले पियुष बन्सल?

“धार्मिक मान्यता आणि त्यांचे पालन करण्याबाबत आमच्याकडे कोणतेही बंधन नाही. बिंदी किंवा टिळा लावण्यासाठी कोणालाही बंदी नाही. आम्ही आमची नियमावली वारंवार अपडेट करत असतो”, असे बन्सल यांनी एक्सवर पोस्ट करुन स्पष्ट केले आहे. सध्या व्हायरल होणारी कंपनीची नियमावली जुनी असल्याचेही त्यांनी सांगितले. बन्सल यांनी कंपनीने वापरलेल्या भाषेत दोष असल्याचे मान्य करत काही गैरसमज निर्माण झाला असल्यास माफी मागतो असेही स्पष्ट केले.

lenskart viral guideline
lenskart viral guideline (X/RDXthinksthat)

जुने परिपत्रक असल्याचा दावा

दुसऱ्या एका पोस्टमध्ये बन्सल यांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणारे परिपत्रक जुने असून, हा कंपनीच्या एचआर धोरणाचा भाग नसल्याचे सांगितले. या परिपत्रकावर देण्यात आलेल्या बंदी आणि टिळ्याचा संदर्भ चुकीचा असल्याचे सांगत नियमावलीचा तो भाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. १८ फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची कंपनीने दखल घेतली होती. नियमावली सार्वजनिक करण्यापूर्वीच तो वादग्रस्त संदर्भ हटविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चूक मान्य

पियुब बन्सल यांनी झालेली चुकीची जबाबदारी स्वत:वर घेत ही चूक पूर्वीच सोडवायला हवी होती, असे मान्य केले. कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने मी ह चूक पूर्वीच दुरुस्त करायला हवी होती, असे स्पष्ट केले. यापुढे नियमावली तयार करताना आणि ती सार्वजनिक करण्यापूर्वी त्याची पूर्णपणे पडताळणी आणि खातरजमा केल्याशिवाय प्रसिद्ध करु नये अशा सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.