मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करू!; पक्षांतर्गत वा मिटवण्यासाठी राहुल गांधी यांची अखेर घोषणा

जालंधरमध्ये आभासी सभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंजाब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पक्षांतर्गत वा मिटवण्यासाठी राहुल गांधी यांची अखेर घोषणा

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंजाबचा दौरा केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वा पंजाबच्या लोकांना हवे असेल तर पक्ष लवकरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करेल पण, दोन व्यक्ती नेतृत्व करू शकत नाहीत. एकाकडे नेतृत्व सोपल्यावर इतरांनी एकजुटीने नेतृत्वाच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे सांगत राहुल गांधी यांनी सिद्धू आणि चन्नी या दोघांनाही इशारा दिला.

जालंधरमध्ये आभासी सभेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंजाब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यापूर्वी त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. या भेटीत सिद्धू व चन्नी यांच्यासह काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीतील १०९ उमेदवारही सहभागी झाले होते. उमेदवारांना बरोबर घेऊन राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये शक्तिप्रदर्शन केले व पक्षांतर्गत एकी दाखवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असून उमेदवारांच्या निवडीवरून प्रदेश काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. उर्वरित ८ उमेदवारांची काँग्रेसने अजून घोषणा केलेली नाही. कॅप्टन अमिरदरसिंग यांनी पटियाला शहर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसला त्यांच्याविरोधात उमेदवार निश्चित करता आलेला नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांचा पंजाबमधील हा पहिलाच निवडणूक प्रचार दौरा होता. जालंधर

येथील आभासी सभेत राहुल यांच्याबरोबर सिद्धू व चन्नी हे दोघेही व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री पदासंदर्भातील राहुल गांधी यांचा निर्णय आपण स्वीकारू, असे सिद्धू म्हणाले. तर, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोणीही असो आपण त्या व्यक्तीसाठी प्रचार करू, असे चन्नी म्हणाले.

खासदारांच्या गैरहजेरीमुळे वाद

राहुल गांधी यांच्या पंजाब दौऱ्यात काँग्रेसचे पाच खासदार गैरहजर राहिल्याने गुरुवारी नवा वाद निर्माण झाला. मनीष तिवारी आणि प्रिनीत कौर या दोन्ही खासदारांची पक्षांतर्गत नाराजी लपवून ठेवलेली नाही. मनीष तिवारी ‘’जी-२३’’ या बंडखोर गटातील नेते आहेत. प्रिनीत कौर या कॅप्टन अमिरदरसिंग यांच्या पत्नी असून अमिरदरसिंग यांनी काँग्रेस सोडल्यापासून कौरही पक्षाच्या कार्यक्रमांपासून लांब राहात आहेत. गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये जसबीर सिंग डिम्पा, रवनीत बिट्टू, महम्मद सादीक यांचीही नावे घेतली जात आहेत. यासंदर्भात, ‘’पंजाब काँग्रेसला बहुधा ११७ उमेदवारांनाच निमंत्रण द्यायचे असावे. मला मुख्यमंत्री वा प्रदेशाध्यक्ष वा काँग्रेस प्रभारी या पैकी कोणीही निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे मी राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी झालो नाही. दौऱ्यावर बहिष्कार टाकलेला नाही’’, असे डिम्पा यांनी स्पष्ट केले. महम्मद सादिक यांनी नातेवाईकाच्या निधनामुळे आपण उपस्थित राहू शकलो नसल्याची माहिती पत्रकारांना दिली. पंजाब काँग्रेसने वादावर पडदा टाकला असून फक्त उमेदवारांना निमंत्रण देण्यात आले होते, असे स्पष्ट केले. खासदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे संघटना महासचिव के. वेणुगोपाल यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले.

उत्तर प्रदेश देशाचे भविष्य ठरवेल- शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे तीनही भाजपनेत्यांनी गुरुवारी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचार केला. शहा यांनी कैरानानंतर गुरुवारी मथुरामध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश देशाचे भविष्य ठरवणार असून मतदारांनी विकास साधणाऱ्या पक्षाला मते द्यावीत, असे आवाहन शहा यांनी केले. योगी सरकारच्या काळात गुंडगिरी मोडून काढण्यात आली, समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेत आले तर, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा गुंडाराज सुरू होईल, असेही शहा म्हणाले. अयोध्या, वाराणसीनंतर मथुरालाही धार्मिक स्थळ म्हणून महत्त्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मानले जात आहे. २०१४ व २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०१७ ची विधानसभा निवडणूक या तीनही निवडणुकीत मथुरेत फक्त कमळ फुलले होते. त्याबद्दल इथल्या मतदारांना धन्यवाद देत आहे, असेही शहा म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Let announce the face of the chief minister post rahul gandhi final announcement akp

Next Story
मी हलके नाणे नव्हे!; ‘राष्ट्रीय लोक दला’चे प्रमुख जयंत सिंह यांचे अमित शहांना प्रत्युत्तर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी