१२ मे २०२६ ला त्विशा शर्मा या मॉडेल आणि अभिनेत्रीचा मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांनी, १२ मे रोजी भोपाळमधील तिच्या पतीच्या घरी त्विशा शर्मा मृतावस्थेत आढळली होती. ती ३३ वर्षांची होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ सिंग यांच्याविरुद्ध त्याची पत्नी त्विशा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणात आरोप पत्र दाखल केलं आहे. दरम्यान त्विशाचा शेवटचा मेसेज काय होता ते समोर आलं आहे ज्यातून सीबीआयच्या हाती पुरावा लागला आहे.

सीबीआयने काय म्हटलं आहे?

१२ मे २०२६ च्या रात्रीचे ९ वाजून ३६ मिनिटं झाली आहेत. त्विशाने आयुष्य संपवण्याच्या काही मिनिटं आधी तिच्या वहिनीला म्हणजेच राशी अब्रोलला तिचा शेवटचा मेसेज पाठवला. तिने राशीला मेसेज करत म्हटलं होतं, ‘उद्या त्याला त्याच्या पत्नीचं उरलंसुरलं सामानही घेऊन जायला सांग. मला आता शांततेत मरुदेत’ राशीला त्विशाने मृत्यूच्या पूर्वी काही मिनिटं आधी पाठवलेला मेसेज हा सीबीआयसाठी मोठा पुरावा ठरला आहे. त्विशाला तिचा नवरा समर्थ आणि तिची सासू गिरीबाला सिंह हे कथित मानसिक त्रास देत होते. सोमवारी सीबीआयने भोपाळच्या न्यायालयात त्यांचा अंतिम अहवाल (Closer Report) सादर केला. यामध्ये सीबीआयने हेच म्हटलं आहे की समर्थ आणि गिरीबाला सिंह यांनी त्विशाला मानसिक त्रास दिला, तिचा छळ केला. त्यामुळे तिच्यापुढे आयुष्य संपवण्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही.

सीबीआयच्या अहवालात आणखी काय म्हटलं आहे?

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार त्विशा शर्माने तिचा जो मानसिक छळ होत होता त्याबाबत तिच्या आई वडिलांशी, वहिनीशी, डॉक्टरांशी चर्चा केली होती. ३० एप्रिलला त्विशाने तिच्या आईला फोनवर मेसेज केला होता. त्विशाने या मेसेजमध्ये म्हटलं होतं की माझी तब्बेत बिघडते आहे, मला विमानात अँझायटीचा अटॅक आला. आई माझं आयुष्य म्हणजे नरक झाला आहे. सीबीआयने जे काऊन्सिलर्स आणि डॉक्टर त्विशाला थेरेपी देत होते त्यांचेही जबाब नोंदवले आहेत. त्यांनीही हेच सांगितलं की त्विशाचा मानसिक छळ होत होता. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.

सीबीआयने ६३६ पानांचा अहवाल केला सादर

सीबीआयच्या ६३६ पानांच्या दोषारोपपत्रात हुंडाबळी, वैवाहिक क्रूरता, आत्महत्येस प्रवृत्त करणं आणि समान गुन्हेगारी हेतूने केलेल्या कृतींशी संबंधित कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. त्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता, तसंच तिच्या सासरच्या लोकांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं होतं. एफआयआर नोंदवल्यानंतर समर्थ सिंग सुरुवातीला पोलिसांना सापडत नव्हता, त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याला २२ मे रोजी जबलपूरमधून अटक करून भोपाळला आणण्यात आलं. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि समर्थ सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिच्या मृत्यूच्या वेळेस त्याचा मोबाईल फोनचा वापर, डिजिटल संपर्क आणि घडामोडींचे विश्लेषण करण्यात आलं.