जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत शनिवारी सुरक्षा दलांनाही मोठे यश मिळाले. पम्पोर चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला ठार केले. त्याचा आणखी एक साथीदारही ठार झाला आहे. चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला. शोध मोहीम अद्याप सुरू आहे.

जम्मू -काश्मीर पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर भागात उमर मुश्ताक खांडेला घेराव घातला. यानंतर प्रदीर्घ चकमकीनंतर दहशतवादी ठार झाला. यावर्षी ऑगस्टमध्ये पोलिसांनी हिटलिस्ट जारी केल्यानंतर सुरक्षा दलांनी लक्ष्य केलेल्या दहशतवाद्यांपैकी उमर हा आहे. सुरक्षा दलांच्या हिट लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या इतर दहशतवाद्यांमध्ये सलीम पर्रे, युसूफ कंत्रो, अब्बास शेख, रियाज शेटगुंड, फारूक नली, जुबैर वाणी, अशरफ मोलवी, साकीब मंजूर आणि वकील शाह यांचा समावेश आहे.

जम्मू -काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत उमरला घेरण्यात आले होते. ऑगस्टमध्ये पोलिसांनी जारी केलेल्या हिटलिस्टमध्ये ठेवलेल्या दहशतवाद्यांमध्ये उमरचा समावेश होता. तेव्हापासून सुरक्षा दल त्याचा शोध घेत होते.

पोलीस महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. “उमर हा या वर्षाच्या सुरुवातीला श्रीनगर जिल्ह्यातील बाघाट येथे दोन पोलिसांच्या हत्येत सहभागी होता. श्रीनगरमधील बाघाट येथे दोन पोलिसांच्या हत्येमध्ये आणि दहशतवादाशी संबंधित इतर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या टॉप १० दहशतवाद्यांमध्ये एलईटी कमांडर उमरला घेरण्यात आले. पोलिसांनी नंतर त्याला ठार केल्याची माहिती दिली.”

उमरने दोन पोलीस कर्मचाऱ्यांची केली होती हत्या

१९ फेब्रुवारी रोजी श्रीनगरमध्ये उमरने दोन पोलीस कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेचा व्हिडिओही समोर आला, जो जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. व्हिडीओमध्ये असे दिसून आले की, दहशतवादी दिवसाढवळ्या उघडपणे पोलिसांवर गोळ्या झाडत आहे. मृत जम्मू -काश्मीर पोलिस कर्मचारी सुहेल आणि मोहम्मद युसूफ असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या दोन्ही जवानांना रुग्णालयात नेण्यात आले, पण नंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.