Libya Misrata Airport Plane Crash: लिबियात विमान अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (१४ सप्टेंबर) एका महत्त्वाच्या व्यक्तीला घेऊन जाताना मिसराता विमानतळावर हे विमान कोसळल्याचे वृत्त ‘अल अरेबिया’ने दिले आहे. या वृत्तानुसार, संबंधित क्षेत्रातील हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. मृत प्रमुख व्यक्तीची अद्याप ओळख स्पष्ट झालेली नाही.

गेल्या वर्षी लिबियाच्या लष्कर प्रमुखांचा अपघात

गेल्या वर्षी, लिबियाचे लष्कर प्रमुख जनरल मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा तुर्कस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथून उड्डाण करणाऱ्या फाल्कन ५० या विमानामध्ये जनरल मोहम्मद अली अहमद अल-हद्दाद प्रवास करत होते. या अपघातात त्यांच्यासह इतर चार लष्करी अधिकारी आणि तीन कर्मचारी जागीच ठार झाले. अंकारा विमानतळावरून उड्डाण केल्यावर सुमारे ४२ मिनिटांनी, म्हणजेच स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी या बिझनेस जेटचा संपर्क तुटल्याची माहिती तुर्कस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री अली येर्लिकाया यांनी दिली.

अंकारावर सापडले अवशेष

त्रिपोलीच्या दिशेने जाणाऱ्या या जेटने संपर्क तुटण्यापूर्वी आपत्कालिन लँडिंगची विनंती केली होती. या विमानाचे अवशेष अंकाराच्या काही अंतरावर सापडले असून, त्याचा व्हाईस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे. ६ सप्टेंबर २०२६ रोजी, मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘२१ एअर’ द्वारे चालवले जाणारे ‘अॅमेझॉन प्राइम एअर’चे एक मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, ज्यामध्ये जमिनीवरील पाच जण ठार झाले तर अन्य पाचजण जखमी झाले होते.

जगभरात २० ते २५ मोठे विमान अपघात

या घटनेनंतर, अपघाताचा तपास सुरू असतानाच, अॅमेझॉनने १३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘२१ एअर’ सोबतचे सर्व कामकाज स्थगित केले आहे. यावर्षी जगभरात अंदाजे २० ते २५ मोठे प्राणघातक विमान अपघात नोंदवले गेले आहेत, ज्यामुळे १८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.