पुणे : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सेठ बुधवारी उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारणार असून, मंगळवारी त्यांनी दक्षिण मुख्यालयात ‘गार्ड ऑफ ऑनर’ची पाहणी केली.
सेठ यांची जुलै २०२४मध्ये दक्षिण मुख्यालयाचे ५१वे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षाहून अधिक काळात त्यांनी दक्षिण मुख्यालयातील संस्थात्मक परिवर्तन, क्षमतावृद्धी, भविष्यकासाठी सैन्य दल सज्ज करण्यावर प्राधान्याने भर दिला. मंगळवारी त्यांनी दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोडताना युद्ध स्मारक येथे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर ‘गार्ड ऑफ ऑनर’ची पाहणी केली. दक्षिण कमांडमधील सर्व अधिकारी, जवानांना संदेश देताना सेठ यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार, बहुआयामी युद्धतंत्र यासाठी लढाऊ कौशल्य अधिक सक्षम करण्याचे, पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
